- राजेंद्र कुमारलखनौ : उत्तरप्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी होणाऱ्या राजकीय पक्षानेच उत्तरप्रदेशात सरकार स्थापन केले आहे, असा या मतदारसंघाचा इतिहास आहे. हा समज यावेळीही खरा ठरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात या मतदारसंघात १० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. महाभारताच्या कालखंडात राजधानी असलेल्या हस्तिनापुरात यावेळी सर्वच राजकीय पक्ष चढाओढीने निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. हा मतदारसंघ राखीव आहे.मागच्या निवडणुकीत ही जागा भाजपने जिंकली होती; परंतु यावेळी भाजपच्या उमेदवाराला तगडी लढत द्यावी लागत असल्याने या मतदारसंघातील निवडणूक आणखीनच रंगतदार होत चालली आहे.
हा मतदारसंघ बिजनौैर लोकसभा मतदारसंघात येत असून, १९५७ मध्ये अस्तित्वात आला आणि १९६७ मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. मागच्या निवडणुकीत भाजपचे दिनेश खटिक निवडून आले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. भाजपने यावेळीही त्यांना या मतदारसंघातून उमेदवार केले आहे. त्यांच्याविरुद्ध समाजवादी पार्टी-राष्ट्रीय लोक दल आघाडीचे योगेश वर्मा आणि काँग्रेसच्या अर्चना गौतम (अभिनेत्री), बसपाचे संजीव जाटव रिंगणात आहेत. अर्चना गौतम यांची ही पहिलीच निवडणूक आहे.