लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी (Rahul Gandhi and Priyanka Gandhi) यांच्यावर जबरदस्त प्रहार केला. यामुळे काँग्रेसचा तिळपापड उडाला आहे. ANI ला दिलेल्या एका मुलाखतीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या सरकारची पाठ थोपटताना काँग्रेसवर जबरदस्त निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाऊ-बहीण म्हणत राहुल आणि प्रियांका गांधी यांनाही टोला लगावला. उत्तर प्रदेशात आज दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे.
विरोधकांना विकास पाहवेना...-काँग्रेससंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेसला बुडवण्यासाठी इतर कुणाचीही गरज नाही, हे भाऊ-बहीण पुरेसे आहेत. आज उत्तर प्रदेशात जेवढ्या शांततेत निवडणुका होत आहेत, तेवढ्या शांततेत यापूर्वी कधीही झाल्या नाही. आमच्या सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष देण्यात आले. राज्याचा होत असलेला विकास विरोधकांना पाहावला जात नाही. यामुळेच ते अर्थहीन बडबड करत आहेत.
कायद्याचा धाक असायलाच हवा -मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, प्रत्येक गुन्हेगाराला कायद्याचा धाक असला पाहिजे. यापूर्वी उत्तर प्रदेशात अराजकता शिगेला पोहोचली होती. गेल्या ५ वर्षात एकही दंगल झाली नाही, आता कर्फ्यू लागत नाही. आज उत्तर प्रदेशात कांवड यात्रा मोठ्या दिमाखात निघते. श्रद्धेचा आदर केला जातो. अखिलेश यादव यांनाही आझम खान बाहेर निघावेत, असे वाटत नाही. कारण त्यांची खुर्ची धोक्यात येईल. आझम खान अथवा इतर कुठलीही प्रकरणे न्यायालयाशी संबंधित आहेत, राज्य सरकार कुणालाही जामीन देत नाही.
उत्तर प्रदेशात 55 जागांवर मतदान - आज विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यात मतदान सुरू आहे. यूपीतील 55 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. याशिवाय गोवा आणि उत्तराखंडच्या सर्व विधानसभा जागांसाठी आज मतदान होत आहे. निवडणुकीचा हा टप्पा सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. अनेक दिग्गजांची विश्वासार्हता पणाला लागली आहे.