नवी दिल्ली: आज देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल हाती येत आहेत. पाचपैकी चार राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस पिछाडीवर आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निराश होऊ नका, आपली लढाई आता सुरु झाली आहे असा संदेश दिला आहे.
एग्झिट पोलमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी काल ट्विटरवरुन कार्यकर्त्यांच्या नावे एक संदेश दिला. 'राज्यात दीर्घकाळ काँग्रेसचे सरकार नसतानाही तुम्ही ज्याप्रकारे जनतेसाठी लढलात आणि राजकारणाचा खरा उद्देश असलेल्या जनसेवेसाठी कटिबद्ध राहिलात, याचा मला खूप अभिमान आहे. जनादेशाचा आदर करत देश व राज्याप्रती निष्ठा व समर्पण भावनेने लढा सुरू ठेवण्याची तयारी आपल्याला करावी लागेल. आपला लढा नुकताच सुरू झाला आहे. आपल्याला धैर्याने आणि नव्या ऊर्जेने पुढे जायचे आहे,' असं प्रियंका गांधी म्हणाल्या.
गांधी घराण्याचे दोन पारंपरिक मतदारसंघही धोक्यात
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली असून, आता जवळपास दोन तासांनंतर 383 जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप 250 जागांसह आघाडीवर आहे. तर सपा 121 जागा, बसप 05, काँग्रेस 03 आणि अन्य 03 वर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणूकीच्या पहिल्या कलानूसार, काँग्रसेला धक्का बसलाच आहे. मात्र गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असेलल्या रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत. हा काँग्रेससाठी मोठा हादरा मानला जात आहे.