लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भाजपने जवळपास 270 जागांवर आघाडी मिळवली आहे. यातच, भाजप आपल्या विजयाच्या अफवा पसरवत आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, राज्यात सपाचेच सरकार स्थापन होईल, असा दावा समाजवादी पक्षाने केला आहे.
'सपा उमेदवारांचा विजय घोषित केला जात नाहीय' -उत्तर प्रदेश निवडणूक निकालासंदर्भात आणि भाजपच्या वतीने केल्या जात असलेल्या जल्लोषासंदर्भात विचारले असता, सपाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल म्हणाले, 'आतापर्यंत केवळ 50 टक्केच मतमोजणी झाली आहे आणि भाजप विजयाचा जल्लोष करत अफवा पसरवत आहे," एवढेच नाही, तर अफवा पसरवता यावी म्हणून, निवडणूक आरोयगाच्या वेबसाइटवर सपाच्या उमेदवारांचा विजय घोषित केला जात नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
सपा कार्यकर्त्यांना आवाहन - सपा कार्यकर्त्यांना आवाहन करत पटेल म्हणाले, "कार्यकर्त्यांनी खचून न जाता मतमोजणी केंद्रावर शेवटपर्यंत थांबावे. अंतिम निकाल जाहीर झाला, की सपाच विजयी होईल आणि अखिलेश यादव हेच मुख्यमंत्री होतील."
निकालात भाजपला बहुमत -निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार, आतापर्यंत राज्यातील 403 विधानसभा जागांपैकी भाजप 246 वर जागांवर पुढे आहे. तर समाजवादी पक्ष आणि त्याच्या सहकारी पक्षांनी एकूण 134 जागांवर आघाडी मिळवलेली आहे. निकालांत स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मुख्यालयात आनंद साजरा करायलाही सुरुवात केली आहे.