UP Assembly Election Rusult 2022: उत्तर प्रदेशात, बसपा, काँग्रेस नाही तर या पक्षांनी मिळवलं तिसरं-चौथं स्थान, धक्कादायक आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 06:43 PM2022-03-10T18:43:37+5:302022-03-10T18:44:23+5:30
Uttar Pradesh Assembly Election Rusult 2022: उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणि सपाच्या आमने-सामनेच्या लढाईमध्ये उत्तर प्रदेशमधील पारंपरिक पक्ष असलेल्या बसपा आणि काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.
लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने बंपर यश मिशवलं आहे. भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांनी मिळून २६५ हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपाला कडवी टक्कर देणाऱ्या सपाने १०० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र भाजपा आणि सपाच्या आमने-सामनेच्या लढाईमध्ये उत्तर प्रदेशमधील पारंपरिक पक्ष असलेल्या बसपा आणि काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. आज सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेस दोन तर बसपा केवळ एका जागेवर आघाडीवर आहे. त्यामुळे या पक्षांची अवस्था छोट्या पक्षांपेक्षाही वाईट झाली आहे. तर भाजपासोबत आघाडीत असणाऱ्या अपना दल (सोनेलाल), निशाद पार्टी आणि समाजवादी पक्षाचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकदल पक्षाने काँग्रेस आणि बसपापेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
उत्तर प्रदेशमधील सध्याच्या कलांमध्ये भाजपा २५१ जागांवर आघाडीवर आहे. तर समाजवादी पक्ष ११४ जागांवर आघाडीवर आहे. या दोन पक्षांनंतर भाजपाच्या आघाडीतील अपना दल (सोनेलाल) या पक्षाने १२ जागांवर आघाडी घेत तिसरे स्थान पटकावले आहे. तर समाजवादी पक्षाचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकदल पक्षाने आठ जागांवर आघाडी घेत चौथे स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ ७ जागांसह निशाद पार्टी पाचव्या स्थानावर आहे. तर सुहेलदेव भारतीय समाज पक्ष सहा जागांसह सहाव्या स्थानी आहे. त्यापाठोपाठ जनसत्तादल लोकतांत्रिक आणि काँग्रेस प्रत्येकी २ जागांसह सातव्या क्रमांकावर आहे. तर बसपा एका जागेसह आठव्या स्थानी आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये बसपा आणि काँग्रेस यांच्या जागाच घटल्या नाहीत तर त्यांच्या मतांमध्येही लक्षणीय घट दिसून आली आहे. बसपाला यावेळी केवळ १२.७० तर काँग्रेसला अवघी २.३९ टक्के मते मिळाली आहेत. २०१७ च्या निवडणुकीत बसपाला १९ तर काँग्रेसला ७ जागा मिळाल्या होत्या. मात्र त्या जागाही यावेळी या पक्षांना राखता आलेल्या नाहीत.