उत्तर प्रदेशातील बलियामध्ये उष्णतेने कहर सुरूच आहे. येथे उष्णतेच्या लाटेने गेल्या चार दिवसांत 57 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, उष्माघाताने दोनच जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. उर्वरित अहवाल तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. मृत्यूचं नेमकं कारण काय? हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, उपचारासाठी येणारे बहुतेक रुग्ण प्रथम छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार करतात. यानंतर ताप येतो.
लखनौचे आरोग्य संचालक डॉ. एके. सिंह यांनी वाढत्या उष्णतेमुळे रुग्णांच्या मृत्यूच्या वाढत्या संख्येवर सांगितले की, उपचारासाठी येणाऱ्या बहुतेक रुग्णांनी प्रथम छातीत दुखणे, श्वासोच्छवासाचा त्रास आणि नंतर ताप आल्याची तक्रार केली. आम्ही यूरीन टेस्ट, ब्लड टेस्ट आणि अन्य टेस्ट घेत आहोत. बाकीचे रुग्ण घाबरून रुग्णालयात पोहोचले. इतर दाखल झालेल्या रुग्णांमध्ये अशा लोकांचाही समावेश होतो ज्यांना आधीच आजार झाला होता. आम्ही नमुने घेत आहोत, त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल.
दुसरीकडे लखनऊहून आरोग्य विभागाचे एक पथकही रुग्णांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी बलिया येथे पोहोचले आहे. रविवारी बलिया जिल्हा रुग्णालयातील वॉर्डांची तपासणी करणारे संचालक (संसर्गजन्य रोग) डॉ. एके. सिंह आणि संचालक केएन तिवारी यांनी उष्णतेमुळे मृत्यू होण्याची शक्यता नाकारली.
रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर डॉ. ए.के. सिंग म्हणाले की, मृत्यूची संख्या चिंताजनक आहे, परंतु बहुतांश घटनांमध्ये रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांतच मृत्यू झाले आहेत. सिंह म्हणाले की, बहुतेक प्रकरणांमध्ये, प्रवेशानंतर दोन ते सहा तासांच्या दरम्यान मृत्यू झाला. आमच्या वैद्यकीय कर्मचार्यांना रुग्णांना स्थिर करण्यासाठी किंवा आवश्यक चाचण्या करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकला नाही. उष्माघाताने मृत्यू झाला का?
डॉक्टर म्हणाले की, मृत्यूच्या कारणाबाबत भाष्य करणे घाईचे आहे. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांपैकी बहुतेक बांसडीह आणि गडवार भागातील आहेत. अशा स्थितीत चौकशी समितीने या भागातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा मृत्यू उष्माघाताने झाला आहे का, असे विचारले असता म्हणाले की, हे खरे असेल तर गेल्या काही दिवसांत समान किंवा जास्त तापमानाची नोंद झालेल्या इतर जिल्ह्यांतूनही असेच मृत्यू झाले असते. उच्च तापमानामुळे ताप येऊ शकतो. मात्र, रुग्णालयात उन्हाचा सामना करण्यासाठी कुलर आणि इतर व्यवस्था अपुरी असल्याचे त्यांनी मान्य केले.
मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 40% रुग्णांना होता ताप
सीएमओ जयंत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयाच्या नोंदीनुसार, 54 मृत्यूंपैकी 40% रुग्णांना ताप होता, तर 60% रुग्णांना इतर आजारांनी ग्रासले होते. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ दोन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, सीएमएस एसके यादव म्हणाले की, दररोज सुमारे 125 ते 135 रुग्ण दाखल होत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णालयावर दबाव आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.