उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. एका विवाहितेला तिच्या कुटुंबीयांनी घरामध्ये प्रवेश दिला नाही. हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आणि नंतर न्यायालयानेच महिला सासरी राहून देण्याचा आदेश दिला. पण तरी देखील सासरची मंडळी ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी पोलिसांनीच यावर एक शक्कल लढवली आणि असं काही केलं ज्यामुळे महिलेचा गृहप्रवेश झाला. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील हरी नगर गावातील एका महिलेला सासरी परतताना पोलिसांनी सुरक्षा पुरवली.
महिलेला तिच्या पतीने हुंड्यासाठी घराबाहेर काढलं होतं. त्यानंतर महिलेने न्याय मिळावा म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. महिलेला तिच्या सासरी पोहोचवा आणि तिला सुरक्षा पुरवा, असे आदेश न्यायालयानं पोलिसांना दिले. न्यायालयाचा आदेश मिळताच पोलीस महिलेला तिच्या सासरी पोहोचले. त्यावेळी सासरच्या लोकांनी महिलेशी वाद घातला. महिलेच्या पतीनं आणि त्याच्या कुटुंबीयांनी घराचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. त्यामुळे घराचा दरवाजा उघडण्यासाठी पोलिसांनी बुलडोझर मागवला.
काही महिन्यांनंतर पती-पत्नीमध्ये वाद
पोलिसांनी बुलडोझरच्या मदतीनं घराचा गेट पाडण्याची तयारी सुरू केली. शेवटी बुलडोझरला घाबरून महिलेच्या सासरच्या मंडळींनी दरवाजा उघडला. त्यामुळे महिलेला सासरी जाता आलं. अधिकारी रुबी गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोतवाली शहरातील ढोकलपूर गावातील नूतन मलिकचा विवाह पाच वर्षांपूर्वी हल्दौरच्या हरिनगर येथील बँक मॅनेजर रॉबिन सिंगसोबत झाला होता. तिने सांगितले की, लग्नाच्या काही महिन्यांनंतर पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने पोलिसांनी 23 जून 2019 रोजी नूतनच्या तक्रारीवरून पती रॉबिनला अटक केली. तेव्हापासून नूतन तिच्या माहेरी राहत होती.
बुलडोझर पाहिल्यानंतर सासरच्यांनी उघडला दरवाजा
नूतनचे वडील शेर सिंग यांनी या प्रकरणी नूतनला न्याय मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. रुबी गुप्ता यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना नूतनला तिच्या सासरच्या घरी प्रवेश देण्याचे तसेच सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. नूतन पोलिसांसह सासरच्या घरी गेली तेव्हा रॉबिनच्या कुटुंबीयांनी नूतनला सोबत ठेवण्यास नकार देत घराचे दरवाजे बंद केले. यानंतर बुलडोझरची मदत घेण्यात आली. बुलडोझर पाहिल्यानंतर सासरच्यांनी दरवाजा उघडला आणि नूतनला घरात प्रवेश दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.