उत्तर प्रदेशचेभाजपा नेते संजीव भारद्वाज यांचा गुना येथील राष्ट्रीय महामार्ग-46 वर झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. भारद्वाज हे उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पार्टी ब्रज प्रदेशाचे कार्यालय प्रभारी आणि ABVP चे माजी विभाग संघटना मंत्री, क्षेत्रीय कार्यालय मंत्री होते.
संजीव भारद्वाज आपल्या सहकाऱ्यांसह उज्जैनहून महाकाल दर्शन करून आग्राला परतत असताना कुंभराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खटकिया येथे त्यांच्या गाडीचा टायर फुटला. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून गाडी पलटी झाली.
संजीव भारद्वाज यांच्यासोबत कारमध्ये असलेले श्रावण कश्यप, पुष्पेंद्र यादव, मुकुल फौजदार हेही जखमी झाले. त्याचवेळी चालक आणि समोरच्या सीटवर बसलेले विजय वर्मा यांनी सीट बेल्ट लावल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कार पार्वती पुलाजवळून जात असताना हा अपघात झाला आहे. टायर फुटल्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती दुसऱ्या लेनमध्ये पलटी झाली. गाडीचा मागचा टायर फुटला.
संजीव भारद्वाज हे उत्तर प्रदेश भाजपाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक होते. आग्रा येथील भारतीय जनता पार्टी ब्रज प्रदेश कार्यालयाचे प्रभारी संजीव भारद्वाज यांच्या निधनाबद्दल उत्तर प्रदेशातील भाजपा नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अपघाताची माहिती घेतली आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही शोक व्यक्त केला असून याबाबत ट्विट केलं आहे. भारतीय जनता पार्टी ब्रज प्रदेश कार्यालयाचे प्रभारी आणि ABVP चे माजी विभाग संघटन मंत्री संजीव भारद्वाज यांचे आकस्मिक निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो असं म्हटलं आहे.