उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यामध्ये निराधार महिला, वृद्ध, निवडक विद्यार्थी यांना पेन्शन- स्कॉलरशीप जाहीर केली आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघासह आपल्या मतदारसंघासाठी मेट्रोची घोषणा केली आहे.
युपीचे अर्थमंत्री विनोद खन्ना यांनी आज 6 लाख 15 हजार 518 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये वृद्धांना १००० रुपये पेन्शन, शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 5 लाखांची नुकसान भरपाई, विधवा महिलांना 1 रुपये पेन्शन आदी घोषणा केल्या आहेत.
अनाथ मुलांना सहावी ते 12 वी पर्यंत मोफत शिक्षणासाठी 300 कोटी रुपये देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेसाठी 600 कोटी रुपये देण्यात आले आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग धोरणांतर्गत पाच वर्षांत 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि चार लाख लोकांना रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बेरोजगारीचा दर जून 2016 मध्ये 18 टक्के होता, तो एप्रिल 2022 मध्ये तो 2.9 टक्क्यांवर आला आहे. 4.22 लाख बेरोजगारांना नोकऱ्या देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
मेरठ-प्रयागराज गंगा एक्सप्रेस-वे साठी 695 कोटींचे बजेट ठेवण्यात आले आहे. वाराणसी आणि गोरखपूरमध्ये मेट्रो सेवा देण्यात येणार आहे. यासाठी १०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. पोलिसांच्या घरांसाठी 800 कोटी रुपये देण्यात आले आहेत.