Success Story: उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एका बस ड्रायव्हरच्या मुलीने अवकाशाला गवसणी घातली आहे. तिचे हे यश अनेकांना प्रेरणा देणारे ठरले आहे. यूपी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या केपी सिंह यांची मुलगी श्रुती हिची भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर पदासाठी निवड झाली आहे.अपार कष्ट,मेहनतीच्या जोरावर त्यांच्या मुलीने एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट या प्रवेश परीक्षेत (एएफसीएटी) संपूर्ण देशातून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. श्रुतीच्या सिंहच्या यशाने सर्वजण भारावून गेले आहेत. शिवाय सर्व स्तरातून श्रुतीचं कौतुक करण्यात येत आहे.
हैदराबादच्या वायुसेना अकादमीत घेणार प्रशिक्षण- मेरठ येथील पल्लव पुरम भागात राहणाऱ्या श्रुती सिंगने एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट या प्रवेश परीक्षेत (एएफसीएटी) 2023 मध्ये गुणवत्ता यादीत AIR 2 मिळवला आहे. जानेवारी 2024 मध्ये भारतीय वायुसेनेच्या फ्लाइंग ऑफिसर या पदासाठी ती हैदराबाद येथील वायुसेना अकादमीमध्ये तिचे प्रशिक्षण सुरू करणार आहे. फ्लाइंग ऑफिसर हे भारतीय हवाई दलात एक सन्मानाचे पद मानले जाते.
यशाचे श्रेय आई-वडिलांना - आई-वडिलांनी मला नेहमीच प्रेरणा दिली असं श्रुती म्हणते.तसेच आपल्या यशाचे श्रेयही तिने आपल्या सर्व प्रियजनांना दिले आहे.शिवाय श्रुतीने तिचे संपूर्ण यश तिचे गुरू कर्नल राजीव देवगण यांना समर्पित केले आहे. त्यांनी एक ग्रुप टेस्टिंग ऑफिसर (GTO) म्हणून अलाहाबाद, बंगलुरू आणि भोपाळ येथे काम केले आहे. श्रुती तिच्या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांना देते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB 0 मुलाखतीची तयारी केली. शेवटी भारतीय वायुसेनेच्या परीक्षेत (AIR 2) मिळाल्याने श्रुती खुप खुश आहे.