लखनौ-
उत्तर प्रदेशमधील माफीया आणि गुन्हेगारांचं आर्थिक साम्राज्य उधळून लावण्याचं उद्दीष्ट योगी सरकारनं ठेवलं असून पुढील दोन वर्षात याविरोधातील कारवाई वेगानं केली जाणार आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी येत्या दोन वर्षात माफिया आणि गुन्हेगारांची जवळपास १२०० कोटींची संपत्ती जप्त करण्याचं टार्गेट ठेवलं आहे. गेल्या पाच वर्षांत यूपी पोलिसांनी आतापर्यंत एकूण २ हजार कोटींहून अधिक किमतीची माफिया आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची संपत्ती जप्त केली आहे.
गँगस्टर अॅक्ट अंतर्गत गुन्हेगार आणि माफियांच्या काळ्या कमाईवर कारवाई करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस कामाला लागली आहे. येत्या दोन वर्षात गुन्हेगारी विश्वाचं आर्थिक कंबरडं मोडून काढण्याचं लक्ष्य पोलिसांनी ठेवलं आहे. गँगस्टर अॅक्ट कलम १४ (१) अंतर्गत माफियांविरोधातील कारवाईत १२०० कोटींची संपत्ती जप्त करण्याचं लक्ष्य पोलिसांनी ठेवलं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोरही पोलिसांच्यावतीनं यासंदर्भातील एक प्रेझन्टेशन देखील सादर करण्यात आलं आहे. २०१७ मध्ये यूपीमध्ये योगी सरकार बनल्यानंतर राज्यातील टॉप-२५ माफियांविरोधात कारवाई करण्याचं अभियान हाती घेतलं होतं. आता याची व्याप्ती वाढविण्यात येणार असून टॉप-५० माफियांविरोधात कारवाई करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत शासन स्तरावर दर आठवड्याला समीक्षा केली जाणार आहे. यासोबतच या माफियांविरोधात कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणांमध्ये जास्तीत जास्त शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. इतर विभागांच्या माध्यमातूनही यूपी पोलिसांनी देखील पुढील १०० दिवसांचं लक्ष्य निश्चित केलं असून मद्य माफिया, पशु तस्कर, वन माफिया, खाण माफिया, शिक्षण माफिया इत्यादींविरोधात कारवाई करत ५०० कोटींची संपत्ती जप्त करण्याची तयारी केली आहे.
पुढील महिन्यात ६ महिन्यांसाठीचं लक्ष्य वाढवून ८०० कोटी इतकं करण्यात आलं आहे. २०१७ साली भाजप सरकार बनल्यानंतर मुख्तार अन्सारी, अतिक अहमद, खान मुबारक, अनिल दुजाना यांच्यासारख्या माफियांविरोधात अभियान चालवून २०८१ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यात मुख्तार, अतिक सारख्या गँग मेंबर्सचा देखील समावेश आहे.