काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे, मात्र उत्तर प्रदेशकाँग्रेस 15 जानेवारीला अयोध्येत रामललाचे दर्शन घेणार आहे. 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. मात्र 15 जानेवारीचा उत्तर प्रदेश काँग्रेसचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे, असे उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय म्हणाले.
काँग्रसेचे नेते 15 जानेवारीला अजय राय यांच्या नेतृत्वाखाली सकाळी उत्तरायण सुरू होताच लखनऊहून सकाळी 9.15 वाजता अयोध्येला जातील आणि याआधी सरयूमध्ये स्नान करून लहार हनुमान गढीमध्ये हनुमानजींचे दर्शन घेतील आणि नंतर रामललाचे दर्शन घेतील.दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले होते, परंतु काँग्रेसने ते निमंत्रण आदरपूर्वक नाकारले आहे.
काँग्रेसकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा भाजप आणि आरएसएसचा सोहळा असून निवडणुकीसाठी अपूर्ण असलेल्या मंदिराचे उद्घाटन करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भाग घेणार नाही. तर दुसरीकडे, उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय आणि राज्याचे प्रभारी अविनाश पांडे यांच्यासह उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते 15 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी अयोध्येला जाणार आहेत.
उत्तर प्रदेशातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते सरयू नदीत स्नान करतील आणि त्यानंतर राम मंदिर आणि हनुमानगढी मंदिरात दर्शन घेतील. अजय राय म्हणाले की, "काँग्रेसने 15 जानेवारीला अयोध्येत रामललाचे दर्शन घेण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी 9.13 सूर्य 'उत्तरायण' होईल आणि 9.15 वाजता 'जय सिया राम' म्हणत आम्ही अयोध्येकडे रवाना होऊ."
याचबरोबर, अजय राय यांनी हे राजकीय पाऊल म्हणून स्वीकारण्यास नकार देत हे पूर्णपणे धार्मिक पाऊल असल्याचे सांगितले. त्यांच्या धार्मिक भावनांमुळे ते अयोध्येला जात आहेत. काँग्रेसच्या उत्तर प्रदेश युनिटचे प्रमुख झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच अयोध्या भेट आहे. मात्र, त्यांनी यापूर्वी अनेकदा अयोध्येला भेट दिली आहे. दरम्यान, येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात काँग्रेस सहभागी होणार नसली तरी त्याआधी उत्तर प्रदेश काँग्रेसकडून रामलला दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.