उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे. तापमान दररोज रेकॉर्ड मोडत आहे. उत्तर भारत आणि दिल्लीतील अनेक भागात तापमान ५० अंशांच्या जवळ पोहोचले आहे. उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेमुळे ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. पण काम करण्यासाठी मोठ्या लोकांना या कडक उन्हात घराबाहेर पडावं लागत आहे. देशाची राजधानी दिल्लीला देखील याचा फटका बसला आहे.
जून सुरू झाल्यानंतर उत्तर भारतात सकाळपासूनच सूर्य सतत तळपत असतो. पूर्वी हे फक्त रेकॉर्ड तोडण्यापुरतच होतं. पण आता सतत होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेने ३३ हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. यामध्ये शनिवारी कानपूर आणि बुंदेलखंडमध्ये २० जणांचा मृत्यू झाला. कानपूरमध्ये ४६.३, हमीरपूर ४६.२, झाशी ४६.१, वाराणसी ४६, प्रयागराज ४६ आणि आग्रा येथे ४५.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
१२८ वर्षांत बिहारला आता सर्वाधिक उष्णतेचा सामना करावा लागत आहे. पाटण्यात उष्णतेच्या लाटेचा कहर इतका आहे की, लोकांना घरांमध्येच राहावं लागत आहे. सकाळी १० वाजल्यापासूनच रस्त्यांवर अघोषित संचारबंदी आहे. देशाची राजधानी दिल्लीला डबल फटका बसला आहे. एकीकडे उष्णतेचा त्रास तर दुसरीकडे पाण्याची भीषण टंचाई. दिल्लीची परिस्थिती अशी आहे की, या कडक उन्हात लोकांना पाण्याच्या शोधात अनेक किलोमीटर दूर जावे लागते आणि तरीही पाणी मिळत नाही.
दिल्लीतील हवामान विभागाने पुढील तीन दिवस दिल्लीत भीषण गरमी आणि उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. म्हणजे उष्णतेपासून दिलासा मिळण्याची फारशी आशा नाही. मान्सूनच दिल्लीला या उष्णतेपासून वाचवू शकतो. मात्र ३० जूनपूर्वी त्यांचं आगमन होण्याची शक्यता दिसत नाही.
मान्सून कधी येणार?
आयएमडीचे शास्त्रज्ञ सोमा सेन रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून दिल्लीत येण्याची वेळ ३० जूनच्या आसपास आहे. मान्सून थेट दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत नाही. आम्हाला आशा आहे की येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, बंगाल, बिहार, झारखंडच्या काही भागात मान्सूनची स्थिती निर्माण होईल. त्यामुळे थोडे दिवस उष्णतेची लाट अशीच सुरू राहणार आहे. अशा परिस्थितीत सावधगिरी हाच उत्तम उपाय आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा.