लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात ६१ जागांसाठी रविवारी सुमारे ५४ टक्के मतदान झाले. त्यात अयोध्येच्या विधानसभा मतदारसंघाचाही समावेश होता. राममंदिराचा प्रश्न सुटल्यानंतर अयोध्येत प्रथमच विधानसभा निवडणूक होत असल्याने साऱ्यांचे लक्ष तिथे लागले आहे.
प्रयागराज येथे मतदान केंद्रापासून जवळ झालेल्या स्फोटात एका सायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेले नाही. या राज्यात रविवारी चित्रकूटमध्ये ५९ टक्के व त्यापाठोपाठ अयोध्येमध्ये ५८ टक्के मतदान झाले. प्रयागराज येथे संजय व अर्जुन हे दोन्ही भाऊ सायकलवरून जात होते. त्यावेळी एक मोटारसायकल स्वार अचानक रस्त्यात आडवा आला. त्यामुळे अर्जुन सायकलसह खाली पडला. त्याच्या पिशवीतील वस्तूचा स्फोट होऊन अर्जुन जागीच ठार झाला, तर संजय जखमी झाला आहे.
अयोध्येत एका मतदान केंद्राजवळ दोन गटांत हाणामारी झाली. पोलिसांनी या प्रकरणी दोघाजणांना अटक केली आहे. कुंडा येथे ८ ते १० मतदान केंद्रे जनसत्ता दलाच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतल्याची तक्रार समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. (वृत्तसंस्था)
आता दोन टप्पे शिल्लक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक सात टप्प्यांत होत आहे.
- रविवारी झालेल्या पाचव्या टप्प्यानंतर या निवडणुकांचे आणखी दोन टप्पे पार पडणार आहेत.
- उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे.