आगरा: देशात आताच्या घडीला कोरोना संसर्गासह राजकारण आणि निवडणुका यांचेच विषय सर्वाधिक चर्चेला आहेत. पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांपैकी उत्तर प्रदेशमधील निवडणुकांवर (UP Election 2022) अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. इथूनच लोकसभेचा मार्ग प्रशस्त होतो, असे म्हटले जाते. मात्र, उत्तर प्रदेशमधील आगरा येथे एक असा अवलिया माणूस आहे, ज्याने आतापर्यंत ९४ वेळा निवडणुका हरल्या आहेत. असे असले तरी, १०० निवडणुका लढवण्याचा मानस या व्यक्तीने केला आहे.
आगरा येथील या खेरागड भागातील नगला रामनगरमध्ये राहणारे हसनुराम अंबेडकरी असे या अवलियाचे नाव आहे. १९८५ पासून ते आताच्या घडीपर्यंत म्हणजेच २०२२ पर्यंत या माणसाने प्रत्येक लहान मोठ्या निवडणुकांमध्ये भाग घेतला. उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवली. आतापर्यंत ९४ वेळा या माणसाच्या पदरी पराभवाची निराशा पडली, असली तरी हसनुराम यांनी आशा सोडलेली नाही. उत्तर प्रदेश निवडणूक २०२२ मध्येही हसनुराम यांनी दोन ठिकाणाहून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
१०० निवडणूक लढवण्याची इच्छा
मला १०० वेळा निवडणूक लढवण्याची इच्छा असून, केवळ त्यासाठीच मी जिवंत आहे. माझी नजर केवळ निवडणुकांवर असते, असे हसनुराम यांनी सांगितले. अनेक वर्षांपूर्वी एका आमदाराने निवडणूक लढवण्यावरून त्यांची मस्करी केली होती. ती मस्करी त्यांच्या मनाला खूप लागली. तेव्हा त्यांनी प्रत्येक निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून एकामागून एक निवडणूक लढवण्याचा सिलसिला सुरू झाला. हसनुराम यांनी राष्ट्रपतीपदापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत निवडणूक लढवल्या आहेत.
दरम्यान, हसनुराम हे महसूल विभागात कार्यरत होते. सध्या त्यांचे वय ७६ असून, जिवंत असेपर्यंत निवडणूक लढवण्याचा प्रण त्यांनी केला आहे. माझ्या खिशात केवळ ५०० रुपये आणि काही एकर जमीन आहे. केंद्र सरकारच्या योजनेतून निवडणूक लढवतो, असे हसनुराम सांगतात.