राजेंद्र कुमार, लोकमत न्यूज नेटवर्क
लखनौ : सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव एक आठवड्यापासून ज्या घोषणा करत आहेत त्यामुळे भाजपपुढील आव्हाने वाढली आहेत. अखिलेश यादव यांनी शनिवारी अशी घोषणा केली की, उत्तर प्रदेशात सपाचे सरकार आल्यानंतर २२ लाख तरुणांना आयटी क्षेत्रात रोजगार देऊ. तसेच, गुणवंतांना लॅपटॉप दिले जातील.
अखिलेश यादव यांनी यापूर्वीच घरगुती वीज ग्राहकांना ३०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. जुनी पेन्शन लागू करण्याबाबत केंद्र सरकारने अगोदरच स्पष्ट केले आहे की, जुनी पेन्शन योजना लागू करणे शक्य नाही. अखिलेश यादव यांनी सांगितले की, आमच्या सरकारने उत्तर प्रदेशात १८ लाख तरुणांना लॅपटॉप दिले होते. यावेळी २२ लाख तरुणांना आयटी क्षेत्रात नोकरी देऊ. यासाठी राज्यात अनेक जिल्ह्यात आयटी हब उभारणार आहोत.
व्होटबँकचे लक्ष्य
सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यावेळी वन मॅन शोच्या भूमिकेत आहेत. व्होट बँक वाढविण्याच्या उद्देशाने त्यांनी सरकारी कर्मचारी, शेतकरी, शिक्षक यांना पक्षाला जोडण्याचे काम सुरू केले आहे. गरिबांना पाच वर्षे मोफत रेशन हा याचाच एक भाग आहे. अखिलेश यादव आणि त्यांचे रणनीतिकार ६० टक्के मते मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.