लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमधील (UP Election 2022) पाच टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले असून, आता केवळ दोन टप्प्यांतील मतदान राहिले आहे. या दोन टप्प्यातील मतदानानंतर उत्तर प्रदेशसह देशभरातील ५ राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप गड राखणार की, त्रिशंकू होणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. यातच आता उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याची ताकद समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यात नाही, अशी टीका करण्यात आली आहे.
एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सपा, भाजपसह पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना भटक्या गुरांचा होणारा त्रास त्यांना निवडणुकीच्या वेळीच कळला का, अशी विचारणाही ओवेसी यांनी केली. सिकंदरपूर भागात एका सभेला संबोधित करताना ओवेसी यांनी टीकास्त्र सोडले.
अखिलेश यादव यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडे भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याची ताकद नाही. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी बहुजन समाज पार्टीशी युती केली. पण तरीही ते भाजपाला सरकार स्थापन करण्यापासून रोखू शकले नाहीत, या शब्दांत ओवेसी यांनी अखिलेश यादवांवर हल्लाबोल केला. तसेच पंतप्रधान मोदी गेल्या ७ वर्षांपासून चहापान करण्यात इतके व्यस्त आहेत की, त्यांना निवडणुकीच्या वेळीच राज्यातील भटक्या गुरांच्या समस्येची जाणीव झाली. भाजपाने खोटे बोलून राज्यात सत्ता स्थापन केली होती. १० मार्चला मतमोजणीच्या दिवशी भगवा पक्ष उत्तर प्रदेशात संपून जाईल, असा दावा ओवेसी यांनी केला आहे.