लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये आपले गतवैभव प्राप्त करण्यासाठी झगडत असलेल्या काँग्रेसला राज्यात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आरपीएन सिंह यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. दरम्यान, आरपीएन सिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आरपीएन सिंह हे काँग्रेस सोडू शकतात, अशी चर्चा सुरू होती. ते यूपीए सरकारच्या काळात मंत्री होते. तसेच उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमधील पडरौना येथे राहणाऱ्या आरपीएन सिंह यांना काँग्रेसने स्टार प्रचारकसुद्धा बनवले होते. मात्र आज अचानक त्यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
आरपीएन सिंह हे १९९६, २००२ आणि २००७ मध्ये पडरौना विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले होते. दरम्यान, १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत पडरौना लोकसभा मतदारसंघात ते तिसऱ्या स्थानी राहिले होते. तर २००४ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. तसेच २००९ मध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर यूपीए सरकारमध्ये त्यांनीं रस्ते वाहतूक, रस्ते महामार्ग राज्यमंत्री, पेट्रोलियम राज्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आरपीएन सिंह यांना भाजपा उमेदवार राजेश पांडेय यांनी ८५ हजार ५४० मतांनी पराभूत केले होते.
दरम्यान, पक्ष सोडताना आरपीएन सिंह यांनी पक्ष सोडताना एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणाले की, आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाची तयारी करत असताना मी माझ्या राजकीय जीवनातील नव्या अध्यायाचा आरंभ करत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरपीएन सिंह हे भाजपाच्या तिकिटावर पडरौना येथून स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात निवडणूक लढवू शकतात. आरपीएन सिंह हे १९९६ ते २००९ या काळात पडरौना येथून आमदार होते. त्यामुळे त्यांचा येथे चांगला जनाधार आहे. तसेच पडरौना राजघराण्याशी संबंधित असल्याने त्यांना राजासाहेब म्हणून ओळखले जाते.