लखनऊ: देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. उत्तर प्रदेशमधील काही टप्प्यांचे मतदान व्हायचे असून, अन्य राज्यांमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशचा खरा विकास हा भाजपने केला असून, अखिलेश यादव केवळ भूमिपूजन करण्यापुरते मर्यादित राहिले, असा दावा जे. पी. नड्डा यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना जे. पी. नड्डा यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा निवडणुकीबाबत आपली मते मांडली. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला ३०० जागा मिळतील. भाजपचा हा विजय एकतर्फी असेल. आमच्या प्रचारातून किंवा संकल्पपत्रातून विकासाचे मुद्दे कधीही गायब झालेले नाहीत. आम्ही विकासाचे मुद्दे मांडत असताना समोरचा पक्ष चुकीच्या गोष्टी पसरवत असेल, तर ते जनतेसमोर आणणे आमचे काम आहे. मोहम्मद अली जिनांबाबत देशात चांगले बोलले जात असेल, तर यातून एखाद्या कृतीचे समर्थन केले जात असेल, तर त्याबाबत जनतेशी संवाद साधणे गरजेचे आहे, असे नड्डा म्हणाले.
विकासाचे चॅम्पियन भाजपच
उत्तर प्रदेशमध्ये जो विकास दिसत आहे, तो भाजपनेच केला आहे. आम्हीच विकासाचे चॅम्पियन आहोत. सायकलवाले अखिलेश केवळ भूमिपूजन एक्सपर्ट आहेत. रुमाल ठेवल्याने रिझर्व्हेशन होत नाही. कोरोना संकट काळात आणि त्यानंतर जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यात भाजप मोठ्या आघाडीने विजयी झाला आहे. उत्तर प्रदेशमधील आताची निवडणूक सुरक्षेची, विकासाची आहे, असे नड्डा यांनी सांगितले.
दरम्यान, एक काळ होता, जेव्हा धर्माच्या नावावर मतदान होत असे. मात्र, आता तो जमाना गेला. विकासावर आता मतदान होणार आहे. मागील निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांनी मोट बांधली होती. त्याचा काही उपयोग झाला नाही. यंदाची भाजपच सर्वाधिक जागा जिंकून पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला.