उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात आज ५८ जागांवर मतदान झाले. काही ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या. एका मतदारसंघात उमेदवाराने तरुणाला बोगस मतदान करत असल्याचा आरोप करत मारहाण केली. या वेळी विधानसभेला पहिल्याच टप्प्यात बंपर मतदान झाले आहे. कोरोनाच्या सावटात देखील लोकांनी मतदानासाठी रांगा लावल्याने कोणाच्या पारड्यात ही मते जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मथुरा मतदारसंघात 62.90 टक्के, छातामध्ये 64.55 टक्के, मांटमध्ये 65.10, गोवर्धनमध्ये 66.75, मथुरा सदरमध्ये 57.33 आणि बलदेव मतदारसंघात 62.66 लोकांनी मतदान केले आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये ११ जिल्ह्यांत हे मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत चाललेल्या या मतदान प्रक्रियेत जवळपास ५८ टक्के मतदान झाले. शामली जिल्ह्यात सर्वाधिक 69.53 टक्के मतदान झाले आहे.
निवडणुकीचा पहिला टप्पा संपल्यानंतर मुख्यमंत्री योगी म्हणाले की, यूपी विधानसभा निवडणूक 2022 चा पहिला टप्पा आज शांततेत पार पडला. लोकशाहीच्या उत्सवात आपले अमूल्य मतदान करून सहभागी झालेल्या सर्व आदरणीय मतदारांचे मनःपूर्वक आभार. तुमचे मत 'नव्या उत्तर प्रदेश'चा पाया मजबूत करेल.
सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते बरेलीमध्ये म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील मतदानाची जी माहिती समोर येत आहे, त्यानुसार निकाल १० मार्चला नाही तर १० फेब्रुवारीलाच आला आहे. सपा आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. शेतकरी, युवक, सर्व स्तरातील लोकांचा पाठिंबा मिळत आहे. डबल इंजिन सरकारने भ्रष्टाचार दुप्पट करण्याचे काम केले आहे.