लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. यातच आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि जयंत चौधरी यांच्यासह 400 कार्यकर्त्यांविरुद्ध दादरी येथे एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ३ फेब्रुवारीची आहे. दादरी येथे निवडणूक प्रचारादरम्यान समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि आघाडीचे नेते आरएलडी प्रमुख जयंत चौधरी यांच्यावर कोरोना आणि निवडणूक आयोगाच्या (Election Commission) मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
गौतम बुद्धनगर पोलिसांच्या वतीने निवेदन जारी करण्यात आले आहे की, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, आरएलडी प्रमुख जयंत चौधरी, दादरी येथील समाजवादी पार्टीचे उमेदवार राजकुमार भाटी, गौतम बुद्धनगर समाजवादी पार्टीचे प्रमुख इंद्र प्रधान तसेच इतर 300 ते 400 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोपआचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. गुरूवारी हे दोन्ही नेते आपल्या रथयात्रेदरम्यान दादरी येथे पोहोचले होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्तेही उपस्थित होते. मिळालेल्या बातमीनुसार, प्रचंड गर्दीमुळे कोरोना नियमांसोबतच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचेही उल्लंघन करण्यात आले. या प्रकरणी आज दादरी पोलिस ठाण्यात नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोपवृत्तानुसार, अखिलेश-जयंत यांचा ताफा गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास टीएनटीला पोहोचला होता. या दरम्यान, कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीमुळे कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे सार्वजनिकरित्या उल्लंघन करण्यात आले. दरम्यान, कोरोना महामारीमुळे येथे रात्री कर्फ्यू लागू आहे. यासोबतच या नेत्यांवर कलम 144 चे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. जिल्हा प्रशासनाकडून रात्री ८ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली होती.
300-400 अज्ञातांवर एफआयआर दाखलदादरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये अखिलेश-जयंत यांच्यासह समाजवादी पार्टीचे उमेदवार राजकुमार राय यांचेही नाव आहे. त्याचबरोबर 300 ते 400 अज्ञात लोकांची नावेही एफआयआरमध्ये समाविष्ट आहेत. दादरीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून घरोघरी जाऊन प्रचाराची परवानगी देण्यात आली होती, त्यानंतरही नेत्यांनी रथयात्रा काढली. अखिलेश-जयंत यांनी या काळात कार्यकर्त्यांचा मोठा मेळावाही आयोजित केला होता. याप्रकरणी आज सर्वांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.