UP Election 2022: ‘लडकी हूँ, लड सकती हूँ...’; उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रियांका गांधी यांचे महिलाकार्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 06:18 AM2022-03-05T06:18:55+5:302022-03-05T06:19:56+5:30

UP Election 2022: ‘लडकी हूँ, लड सकती हूँ..!’ ही घोषणा महिला, मुलींमध्ये लोकप्रिय ठरली आहे.

up election 2022 i am a girl i can fight priyanka gandhi women card in up elections | UP Election 2022: ‘लडकी हूँ, लड सकती हूँ...’; उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रियांका गांधी यांचे महिलाकार्ड

UP Election 2022: ‘लडकी हूँ, लड सकती हूँ...’; उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रियांका गांधी यांचे महिलाकार्ड

Next

धनाजी कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क

वाराणसी : महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे. महिला राजकारणात येत आहेत; पण त्यांचा कारभार पतीराज पाहतात, अशी महाराष्ट्रासारखी उत्तर प्रदेशातील परिस्थिती आहे. त्यामुळे महिलांना राजकारणात निर्भीडपणे उभे करण्यासाठी आता  ‘लडकी हूँ, लड सकती हूँ..!’ अशी घोषणा देऊन निवडणुकीच्या रिंगणात अनेक महिला उमेदवारांना काँग्रेसने जाणीवपूर्वक उतरविले आहे, असे काँग्रेसच्या प्रवक्त्या सृष्टी कश्यप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

१९९९ च्या लोकसभा निवडणुकीत रायबरेली मतदारसंघात प्रचार करताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनी, ‘माझ्या वडिलांच्या पाठीत वार करणाऱ्याला मत देणार का?’ असा भावनिक सवाल करीत प्रचार केला होता. त्या धर्तीवर ‘लडकी हूँ, लड सकती हूँ..!’ ही घोषणा महिला, मुलींमध्ये लोकप्रिय ठरली आहे. राज्यात  १५ कोटी मतदार आहेत. त्यात महिला मतदारांचे प्रमाण ४६ टक्के आहे. काँग्रेसने येथील ४० टक्के महिलांना तिकिटे दिली आहेत.

विधानसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीत महिलांना उमेदवारीत प्राधान्य देण्यात आले. इतरत्र महिलांकडे व्होट बँक म्हणून पाहिले जाते; मात्र तिकिटे दिली जात नाहीत. या पार्श्वभूमीवर ४० टक्के महिला उमेदवार देण्याच्या धोरणाला उत्तर प्रदेशात काय फळ मिळणार हे पाहावे लागणार आहे. उज्ज्वला गॅस योजना, बेटी बचाओ, सुकन्या समृद्धी योजना, पंतप्रधान आवास योजना अशा अनेक योजना योगी सरकारने राबविल्या आहेत. 

भाजपने ‘कमल किटी क्लब’ सुरू केले आहेत. मात्र महिलांना उमेदवारी देण्याबाबत ते आग्रही दिसत नाहीत.  २०१७ च्या निवडणुकीत भाजपच्या ३६ महिला निवडून आल्या, तर २०१२ मध्ये सपाच्या २० महिला निवडून आल्या होत्या. पहिल्या दलित महिला मुख्यमंत्री अशी ओळख असलेल्या बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी या निवडणुकीत ४०३ जागांपैकी २१ जागांवर महिलांना उमेदवारी दिली आहे. २००७ मध्ये बसपाच्या १० महिलांचा विजय झाला होता.

उन्नाव, हाथरस आम्ही विसरलो नाही : सृष्टी कश्यप

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत भाजपसह कुणी फारसे बोलताना दिसत नाहीत. काँग्रेस पार्टी महिलांची सुरक्षा, स्वाभिमान आणि सन्मान यासंबंधी आग्रही आहे. देशाची जनता हाथरस आणि उन्नावमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटना विसरलेली नाही. काँग्रेसने जाणीवपूर्वक महिलांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे, असे काँग्रेसच्या प्रवक्त्या सृष्टी कश्यप यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

प्रियांका गांधी यांचा प्रभाव

महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा काँग्रेसने घेतला असला तरी सपा आणि भाजप यांच्यातच मुख्य लढत आहे. २०१७ मध्ये महिलांच्या मतांचे प्रमाण ६३ टक्के तर पुरुषांचे प्रमाण ५९ टक्के होते. त्या वर्षी महिलांच्या मतांमध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत ४ टक्क्यांनी वाढ झाली. ४०३ सदस्यांपैकी विविध पक्षांकडून ४२ (१०.४२ टक्के) महिला प्रतिनिधी उत्तर प्रदेशात निवडून आल्या होत्या.

Web Title: up election 2022 i am a girl i can fight priyanka gandhi women card in up elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.