रमाकांत पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क
सिद्धार्थनगर : सपाच्या खासदार जया बच्चन यांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या प्रचार सभेत समाजवादी पार्टीच्या काळात असलेला विकसित उत्तर प्रदेश ५ वर्षांत भकास झाल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी यांनी ५ वर्षांत उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी यांनी ‘उत्तम’ प्रदेश केल्याचा दावा केला.
चित्रपटसृष्टीतील अनेक तारके प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यात भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी, अभिनेत्री अमिषा पटेल यांच्यासह अभिनेत्री हेमामालिनी व अभिनेत्री जया बच्चन यांचाही समावेश आहे. जया बच्चन यांनी आपल्या सभांतून थेट मुख्यमंत्री योगी यांनाच लक्ष केले आहे. त्यांच्या वैयक्तिक टीकेबरोबरच ५ वर्षांत भाजपच्या काळात राज्याचा विकास लयास गेल्याचा आरोप त्या करीत आहेत. भाजपतर्फे हेमामालिनीदेखील आक्रमक झाल्या असून, त्यांनी सपाच्या काळात या राज्याची अधोगती झाली होती. ती भाजपचे मुख्यमंत्री योगी यांनी सुधारल्याचा दावा केला.
दोघीही मैत्रिणी पण...
वास्तविक हेमामालिनी आणि जया बच्चन यांच्या मैत्रीची चर्चा चित्रपटसृष्टीत ऐकायला मिळते. मात्र, सध्या विधानसभा निवडणूक प्रचारात या दोन्ही मैत्रिणी आपापल्या पक्षासाठी मते मागताना अधिक आक्रमक होताना दिसतात. हेमामालिनी या आपल्या प्रचार सभेत योगींच्या विकासकामांचा पाढा वाचत आहेत, तर जया बच्चन या आपल्या सभेतून सपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर कविता सादर करीत असल्याने प्रचारात चांगलीच रंगत भरली आहे.