नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. यादरम्यान, विविध वृत्तवाहिन्यांचे ओपिनियन पोल समोर येत आहेत. दरम्यान, आज झी न्यूज या वृत्तवाहिनीचा ओपिनियन पोल समोर आला असून, यामध्ये उत्तर प्रदेशच्या ओपिनियन पोलबरोबरच देशाच्या पंतप्रधानांबाबतही प्रश्न विचारण्यात आला.
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामधून पंतप्रधानपदासाठी कुणाला पसंती आहे असे विचारले असता उत्तर प्रदेशमधील जनतेने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पसंती दिली. ओपिनियन पोलमध्ये मत व्यक्त करणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी ७२ टक्के मतदारांनी मोदींना पसंती दिली आहे. तर २८ टक्के लोकांनी राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दिली आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी ४७ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाला पसंती दिली आहे. तर ३५ टक्के लोकांनी अखिलेश यादव यांच्या नावाला पसंती दिली आहे. ९ टक्के लोकांनी मायावती यांच्या नावाला तर ४ टक्के लोकांनी अखिलेश यादव यांच्या नावाला पसंती दिली आहे.
झी न्यूजने प्रसिद्ध केलेल्या ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशात भाजपाच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या ओपिनियन पोलनुसार भाजपाला २४५ त २६७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाला १२५ ते १४८ जागा मिळू शकतात. काँग्रेसला ३ ते ७ तर बसपाला ५ ते ९ जागा मिळू शकतात. तर इतरांना २ ते ६ जागांवर समाधान मानावे लागू शकते.