सुधीर लंके, लोकमत न्यूज नेटवर्क
वाराणसी : हिंदू धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र मानली जाणारी ‘काशी’ म्हणजेच वाराणसी हा थेट पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ आहे. येथून त्यांनी नमामी गंगेचा नारा दिला. यंदा गंगा घाटावरही जोरदार संघर्ष दिसतो आहे.
काशीच्या विश्वनाथांचे मंदिर असलेला परिसर वाराणसीच्या ‘शहर दक्षिणी’ मतदारसंघात समाविष्ट होतो. येथे १९८९ पासून सतत भाजपचा आमदार आहे. यावेळी दक्षिणी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार व मंत्री नीलकंठ तिवारी व समाजवादी पक्षाचे किशन दीक्षित यांच्यात लढत आहे. दोघेही ब्राह्मण आहेत. मात्र, तिवारी यांच्याबाबत मोठी नाराजी दिसते. ते मतदारसंघात फारसे फिरकले नाहीत, अशा प्रतिक्रिया मतदारांनी दिल्या. दीक्षित हे महामृत्युंजय मंदिराचे पुजारी आहेत. त्यामुळे त्यांना पंडितांचाही मोठा पाठिंबा आहे. शिवाय मुस्लिम मतदार त्यांच्यासोबत आहेत.
मोदी व योगी यांनी काशीच्या काॅरिडॉरचे काम हाती घेतले आहे. यात मंदिर परिसरात ९०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, ही कामे करताना जुनी घरे, दुकाने काढावी लागली. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेल्याने व्यापारी नाराज आहेत. मंदिर परिसरातील व्यापारी अंकेत गिडवनिया ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘माझे आजोबा भाजपचे माजी शहर अध्यक्ष आहेत, पण या कॉरिडॉरने आमची रोजीरोटी हिरावली.’ सुनील अग्रहारी म्हणाले, ‘२५ वर्षांपासून आम्ही मंदिरात पान-फुलांचे दुकान चालवत होतो. आता बेवारस झालो. ७ मार्चला वाराणसीसह ५४ जागांचे अखेरच्या टप्प्यातील मतदान असून, तत्पूर्वी दोन दिवस मोदी वाराणसीत तळ ठोकणार आहेत. ममता बॅनर्जी २ मार्चला वाराणसीत हजेरी लावण्याची शक्यता आहे.
गंगा परिक्रमेत मोदी, अखिलेश यांचे नारे
मंगळवारी शिवरात्रीनिमित्त वाराणसीच्या गंगा घाटावर भाविकांची ओसंडून गर्दी होती. कोरोनामुळे निवडणूक प्रचारावर बंधने आली; पण शिवरात्रीच्या गर्दीने काहीच बंधने पाळली नाहीत. काशी कॉरिडॉरचे लोकार्पण झाल्यानंतर व कोरोनाकाळानंतर मंगळवारी अनेक भाविकांनी प्रथमच भव्य शिवरात्र अनुभवली. यावर्षी या परिक्रमेत रात्री तरुणांची मोठी गर्दी होती. यात्रेत पायी चालणेही अवघड होते. ‘हर हर महादेव’सोबतच ‘मोदी’ आणि अखिलेश यांचाही गजर होता.