सुधीर लंके, लोकमत न्यूज नेटवर्क
मिर्जापूर : ‘मिर्जापूर, भदोही यह कालीन भैया की नही ‘कालीन उद्योग’ की नगरी है. कालीन भैया के नामसे हमे बदनाम मत करो’, अशी मिर्जापूरची जनता म्हणते. आम्हाला कालीन भैया व गुंडाराजची चर्चा नको, कालीन उद्योग हवा, अशी या दोन्ही जिल्ह्यातील भावना आहे.
उत्तर प्रदेशात अखेरच्या सातव्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांत मतदान आहे. यात मिर्जापूर व भदोही या दोन जिल्ह्यांचाही समावेश आहे. ‘मिर्जापूर’ या वेब सिरीजमुळे हा जिल्हा व परिसर देशभर चर्चेत आला. या सिरीजमध्ये मिर्जापूरमध्ये सर्व गुंडाराज, कट्टे व खुनखराबा दिसतो.
प्रत्यक्षातील मिर्जापूर मात्र तसे नाही. येथे फिरताना सर्वांनीच या वेब सिरीजवर टीका केली. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष ब्रिजदेव पांडे म्हणाले, ‘ही विद्वानांची नगरी आहे, गुंडांची नव्हे. या सिरीजमुळे आमच्या शहराची प्रतिमा खराब झाली’. या सिरीजमध्ये कालीन भैया दाखवला गेला आहे. असा कोणताच भैया येथे नाही. ‘’कालीन’ म्हणजे कारपेट. देशाला रेड कार्पेटही येथूनच जाते. पूर्वी हा उद्योग येथे मोठ्या प्रमाणावर होता. या दोन जिल्ह्यांत घरोघर हे काम चालत होते. मिर्जापूरला पितळी भांड्यांचाही उद्योग मोठा होता, मात्र हे दोन्ही उद्योग आता अडचणीत असल्याचे मिर्जापूर कार्पेट सेंटरमध्ये काम करणारे अशोक दुबे यांनी सांगितले.
मंदिरांचा जीर्णोद्धार, उद्योग बंद
मोदी व योगी सरकारने कालीन उद्योगासाठी व इतर उद्योग आणण्यासाठीही काहीच केले नाही, असे मिर्जापूरला भेटलेले जग्गी खान व आनंद यादव सांगत होते. येथील सिमेंट कारखानेही बंद पडत आहेत. हा प्रदेश विंध्याचल म्हणून ओळखला जातो. येथे विंध्यदेवीचे मंदिर हे शक्तिपीठ आहे. काशीप्रमाणेच तेथे आता कॉरिडॉर बनत आहे. त्यासाठी सरकारने पाचशे कोटी मंजूर केले. या मंदिराच्या कॉरिडॉरचे काम वेगात सुरू असल्याचे तेथे दिसले. ‘सरकार मंदिरे बनवते. तरुणांच्या रोजगारासाठी मात्र काहीच नाही’, असे व्यावसायिक अमरितसिंग खुराणा यांचे म्हणणे आहे.