उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास उरले आहेत. भारतीय जनता पक्ष (BJP), समाजवादी पक्ष (SP), बहुजन समाज पक्ष (BSP) आणि काँग्रेस (Congress) यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. आता जनतेने कोणाच्या पदरात कौल टाकला हे १० मार्चला मतमोजणीच्या दिवशी ठरवले जाईल. मात्र मतदानापूर्वी झालेल्या शेवटच्या ओपिनियन पोलच्या निकालावरून मुख्य लढत भाजप आणि सपा यांच्यात असल्याचे दिसून येते. तसंच पुन्हा एकदा विजय भाजपच्याच पारड्यात येऊ शकतो, असंही सर्वेक्षणातून दिसून येतं.
सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकते. २०१७ पेक्षा चांगली कामगिरी करत भाजपला २२५-२३७ जागा मिळू शकतात, तर सपाला १३९-१५१ जागा मिळू शकतात. बसपाला १३-२१ जागांवर समाधान मानावे लागेल. काँग्रेसला फक्त ४-८ आणि इतरांना २-६ जागा मिळू शकतात असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
पश्चिम उत्तर प्रदेशात काय स्थिती?शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि सपा-आरएलडी युतीतून भाजपचे आव्हान वाढल्याने बहुतांशी नजर पश्चिम यूपीकडे आहे. सी व्होटर ओपिनियन पोलनुसार, पश्चिम उत्तर प्रदेशातील १३६ जागांपैकी भाजप ७१-७५ जागा जिंकू शकतो, तर सपा ५०-५४ जागा जिंकू शकतो. बसपाला ८-१० जागा मिळू शकतील, तर काँग्रेसला १-३ जागांवर समाधान मानावं लागेल. याशिवाय इतरांना ०-१ जागा मिळू शकतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या ठिकाणी एकूण ४०३ जागांसाठी मतदान होणार आहे. तसंच सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार असून १० तारखेला पहिल्या टप्प्याचं मतदान, नंतर १४, २०,२३, २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च, ७ मार्च असं सात टप्प्यांक मतदान होणार आहे.