लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमने यूपी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी सोमवारी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये एमआयएमने पहिल्यांदाच हिंदू उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. साहिबाबाद मतदारसंघातून एमआयएमने हिंदू उमेदवाराला मैदानात उतरवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ओवैसींच्या पक्षाने साहिबाबाद येथून सपामधील बंडखोर पंडित मनमोहन झा उर्फ गामा यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे येथील लढत रंगतदार झाली आहे.
मुळचे बिहारमधील असलेले मनमोहन झा हे दहावी पास आहेत. गरीब कुटुंबातील असल्याने लहान वयातच काम शोधण्यासाठी ते दिल्लीमध्ये आले होते. तेव्हापासून चत्यांचा राजकीय संघर्ष सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी समाजवादी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आणि साहिबाबाद विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. साहिबाबादमध्ये गामा नावाने प्रसिद्ध असलेल्या मनमोहन झा यांचे गाझियाबाद आणि साहिबाबाद परिसरात चांगली पकड आहे. त्यामुळेच साहिबाबादमध्ये त्यांचं वजन वाढलं होतं.
एमआयएमच्या दुसऱ्या यादीत एकूण आठ उमेदवारांची नावे आहेत. त्यामुळे एमआयएने नऊ जागांसाठी उमेदवारांची नावं प्रसिद्ध केली होती. साहिबाबाद विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण राज्यात सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ आहे. येथून २०१२ मध्ये तब्बल १५ उमेदवार रिंगणात होते. तर २०१७ मध्ये येथे ११ उमेदवारांनी नशीब आजमावले होते. तत्पूर्वी साहिबाबाद हा खेकडा विधानसभा मतदारसंघाचा भाग होता. मात्र नव्याने मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर २०१२ मध्ये बसपाच्या अमरपाल शर्मा यांनी भाजपाच्या सुनील शर्मा यांना पराभूत केले होते.
उत्तर प्रदेशमध्ये ४०३ विधानसभा मतदारसंघांसाठी १० फेब्रुवारीपासून सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. १०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारी आणि ३ व ७ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी ही १० मार्च रोजी होणार आहे.