लखनऊ: विधानसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसे उत्तर प्रदेशमधील (UP Election 2022) राजकीय वातावरण ढवळून निघत असल्याचे सांगितले जात आहे. भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासारखे दिसणारे अभिनंदन पाठक लखनऊमधील सरोजिनी नगर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने अभिनंदन पाठक नाराज झाल्याचे बोलले जात आहे.
अभिनंदन पाठक यांनी आपण निवडणूक जिंकू, असा विश्वास व्यक्त केला. योगी आदित्यनाथ पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी सदिच्छा अभिनंदन पाठक यांनी व्यक्त केली आहे. पीएम मोदी आणि सीएम योगी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, ते जनतेसाठी निस्वार्थपणे काम करत आहेत, असे कौतुकोद्गार पाठक यांनी काढले आहेत.
मी निवडणूक नक्कीच लढवणार आहे
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे तिकिटाची मागणी केली होती. पण त्यांनी माझ्या पत्राकडे लक्ष दिले नाही. स्वत:ला मोदीभक्त असल्याचे सांगून ते म्हणाले की, भाजप माझ्याकडे दुर्लक्ष करू शकते, पण मी निवडणूक नक्कीच लढवणार आहे, असे अभिनंदन पाठक यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, यापूर्वीही अभिनंदन पाठक यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते. मात्र, पक्षाने त्यांची मागणी फेटाळून लावली होती. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपला मदत करण्यासाठी ते राज्यात फिरले होते. तत्कालीन मुख्यमंत्री रमण सिंह यांनी त्यांना गांभिर्याने घेतले नाही आणि त्यांची खिल्ली उडवली होती, असा आरोपही पाठक यांनी केला आहे.