लोकमत न्यूज नेटवर्क
मिर्जापूर : ‘मोदी व योगी यांनी तुमच्या घरात मीठ पोहोचविले. गरीब मातांना वाटू शकते तुम्ही आमचे मीठ खाल्ले. मात्र, आम्हीच तुमचे मीठ खाल्ले असून, त्याला जागू. पुन्हा आमचे सरकार आणण्यासाठी घरोघर माझा नमस्कार सांगा,’ असे भावनिक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दुपारी येथील जनसभेत केले.
मिर्जापूर व भदोही या दोन जिल्ह्यांतील प्रचारासाठी येथील बरकछा गावात त्यांची सभा झाली. योगी आदित्यनाथही सभेला होते. सभेची वेळ सकाळी अकरा वाजताची होती. मात्र, मोदी दोन वाजता सभास्थानी आले. त्यामुळे सभेतील अनेक लोक तत्पूर्वीच निघून गेले होते. महिला व पुरुष उन्हात बसून होते. सभास्थानी धूळही खूप होती. त्यामुळेही लोक वैतागले. मोदी लवकर न आल्याने ‘मोदी आवत नही’ अशी चर्चा पसरली. त्यामुळेही अनेक लोक निघून गेले. खेड्यांतून मोठ्या प्रमाणावर बसेसमधून लोक सभेला आले होते.
घटत्या मतदानाची चिंता
उत्तर प्रदेशात मतदानाचे प्रमाण कमी आहे. सहाव्या टप्प्यात ५५ टक्के मतदान झाले. त्यामुळे भाजप चिंतेत आहे. ‘घरोघर माझा नमस्कार सांगा,’ असे आवाहन मोदी करत आहेत. मतदान वाढविण्यासाठी हे आवाहन केल्याचे मानले जाते.