UP Election 2022: “प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार होते, पण ते शक्य झाले नाही”; प्रियंका गांधींनी सांगितले कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 09:16 AM2022-01-22T09:16:26+5:302022-01-22T09:19:05+5:30
UP Election 2022: उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रशांत किशोर काँग्रेससाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असे मानले जात होते.
लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले अनेक जण पक्षांना सोडचिठ्ठी देत नवीन वाट धरत आहेत. यातच राजकारणातील चाणक्य समजले जाणारे दिग्गज रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याविषयी पुन्हा एकदा चर्चा समोर आल्या आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी यामागील कारणे सांगितली आहेत.
एका मुलाखतीत बोलताना प्रियंका गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमध्ये सामील न होण्याबाबत सांगितले. उत्तर प्रदेश निवडणुकांपूर्वी प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून, काँग्रेससोबत काम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रशांत किशोर काँग्रेससाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असे मानले जात होते. मात्र, प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश शक्य झाला नाही, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
अनेक कारणांमुळे पार्टनरशीप सुरू होऊ शकली नाही
प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र, ते शक्य झाले नाही. यामागे अनेक कारणे आहेत. त्यामुळे आमची पार्टनरशीप सुरू होऊ शकली नाही. या मुद्द्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले. अनेक मुद्दे होते, ज्यात दोन्ही बाजूंनी सहमती झाली नाही, त्यामुळे चर्चा झाल्या असल्या तरी गोष्टी अंतिम झाल्या नाहीत, असेही त्या म्हणाल्या. काँग्रेसमध्ये बाहेरील व्यक्ती नको, या चर्चांवर बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, काँग्रेसमध्ये बाहेरील व्यक्ती नको, याबाबतीत कोणताही वाद नव्हता. असे असते तर आम्ही चर्चेलाच बसलो नसतो, असे प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केले. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी प्रशांत किशोर यांची मोठी चर्चा झाली होती.
दरम्यान, आताच्या घडीला जरी प्रशांत किशोर काँग्रेससोबत गेलेले नसले, तरी आगामी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीवेळी प्रशांत किशोर काँग्रेससाठी गेमचेंजर ठरू शकतात, असे सांगितले जात आहे.