UP Election 2022: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल? या प्रश्नावर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. उत्तर प्रदेशात माझ्याशिवाय दुसरा कोणता चेहरा दिसतो का? असं प्रियंका गांधी म्हणाल्या. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज युवांसाठीचा जाहीरनामा जाहीर केला आहे. काँग्रेसचा Youth Manifesto प्रसिद्ध करण्यात आला. यात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील उपस्थित होते.
काँग्रेसचा युवांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर प्रियंका गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? याबाबत प्रियंका गांधी यांना विचारण्यात आलं असता त्यांनी मोठं विधान केलं. "तुम्हाला उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाकडून माझ्या व्यतिरिक्त इतर कुणाचा चेहरा दिसतो आहे का? माझाच चेहरा सर्व ठिकाणी दिसतोय ना?", असा प्रतिप्रश्न पत्रकारांनाच विचारला.
प्रियंकांच्या याच विधानावर आता विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. "प्रियंका गांधींचं म्हणणं अगदी योग्य आहे. त्यांच्याशिवाय उत्तर प्रदेशात काँग्रेसचं इतर कुणी दिसतच नाही. खरंतर वाघ जंगलाचा राजा असं आपण मानतो. पण एक म्हण आहे की एकदा माकडालाही जंगलाचा राजा निवडलं होतं. जेव्हा एखादा व्यक्ती आपली अडचण माकडाकडे घेऊन जायचा तेव्हा माकड एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर उड्या मारू लागला. कारण माकडाला त्याशिवाय दुसरं काहीच जमत नाही", अशी टीका मोदी सरकारमध्ये मंत्री आणि खासदार एसपी सिंह बघेल यांनी प्रियंकांच्या विधानावर केली.
जात नव्हे विकासाच्या मुद्द्यावर मतदान व्हावंजनता जोपर्यंत लोकप्रतिनिधींना जाब विचारणार नाही. तोवर लोकप्रतिनिधी देखील जबाबदारीनं वागणार नाहीत. जनतेला जागरुक व्हावं लागेल. जातीवादानं तुमचं पोट भरणार नाही, असं प्रियंका गांधी म्हणाल्या. उत्तर प्रदेशच्या जनतेनं जातीपेक्षा विकासाच्या मुद्द्यावर मतदान करायला हवं, असंही त्या म्हणाल्या.