गोरखपूर: जेव्हा स्टेजवर आलो, तर मला वाटले मुंबईतच सभा घेत आहे. राजू श्रीवास्तव यांच्या हातात शिवसेनेचा धनुष्यबाण आहे. हा धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंचा आहे. हा धनुष्यबाण घेऊन तुम्ही राज्याच्या विधानसभेत जाल आणि शिवसेनेचे पहिले मंत्री देखील व्हाल, असा मोठा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर गोरखपूर येथे शिवसेना उमेदवारासाठी घेण्यात आलेल्या प्रचारसभेत संजय राऊत बोलत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गडात जाऊन महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि शिवसेना नेत्यांनी भाजपविरोधात पुन्हा हुंकार भरल्याचे सांगितले जात आहे.
आम्ही जेव्हा मुंबईत फिरतो, मुंबईपासून पुण्यापर्यंत कुठेही जातो, तेव्हा लाखो हिंदी भाषिक लोक दिसतात. मुंबईत म्हणाल तर अर्धी मुंबई हिंदी भाषेत बोलते. त्यातही जिथे आम्ही जातो, तिथे १० पैकी ६ लोक सिद्धार्थनगरचे असतात. असे आमचे नाते उत्तर प्रदेशशी आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेचा पहिला मंत्री होईल
राजू श्रीवास्तव यांच्या हातात शिवसेनेचा धनुष्यबाण आहे. हा धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंचा आहे. या धनुष्यबाणाने देशाच्या शत्रूंचा वारंवार खात्मा केला आहे. हा धनुष्यबाण घेऊन तुम्ही राज्याच्या विधानसभेत जाल आणि शिवसेनेचे पहिले मंत्री देखील व्हाल, असा दावा संजय राऊत यांनी केला. शिवसेना द्वेषाचे राजकारण कधीच करत नाही. आमच्या हातात हिंदुत्वाचा भगवा आहे, पण त्यासोबत शीख, मुसलमान, ख्रिश्चनही आहेत. आम्ही देशभक्तीचे राजकारण करतो. कुणाच्या शरीरात कुणाचे रक्त आहे, हे १० मार्चला कळेल. तुमचे रक्त काय आहे, तुमच्या रक्तात काय फिरतेय ते इथली जनता १० मार्चला दाखवून देईल, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.
दरम्यान, उत्तर प्रदेशात परिवर्तनाची लाट आहे. उत्तर प्रदेशात यावेळी सत्ताबदल होणार आहे. ज्या आशेने भाजपाला सत्ता दिली होती. त्या अपेक्षांची पूर्तता होऊ शकलेली नाही. त्यामुळे आता राज्यात परिवर्तन झाले पाहिजे. मोठे बहुमत असूनही भाजपाला जनतेच्या स्वप्नांची पूर्तता होऊ शकली नाही. पाच वर्षांत केवळ दंग्याचीच चर्चा झाली. भाजपाने केवळ घाबरवण्याची भाषा केली. उत्तर प्रदेशमधील विद्यमान मुख्यमंत्री जे काही दिवसांनी माजी मुख्यमंत्री बनतील. ते मुंबईत आले की, मोठमोठ्या जाहिराती देतात. एवढी गुंतवणूक आली, एवढा विकास झाला, एवढे रस्ते बनले, असे दावे करतात. मात्र रोजगार वाढले आहेत की बेरोजगारी वाढली वाढली आहे, महिलांचा सन्मान वाढलाय की अन्याय वाढलाय, हेच आम्हाला बदलायचं आहे. त्यामुळेच परिवर्तनाची लाट येथे आली पाहिजे, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले.