लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक जसजशी रंगात आली आहे, तसतशी उमेदवारांचे एकमेकांसोबत असलेले नातेसंबंधही समोर येऊ लागले आहेत. तीन मतदारसंघ आणि तिथे सासू व दोन जावई असे अनोखे संतुलन समोर आले आहे. यापैकी सासू आणि जावई आमदारकीसाठी उभे राहिले आहेत तर दुसऱ्या जावयाचा भाऊ आमदारकी लढवत आहे. महत्वाचे म्हणजे हे तिघेही वेगवेगळ्या मतदारसंघातून लढत आहेत.
माजी खासदार सुशीला सरोज यांच्या कुटुंबाची ही स्टोरी आहे. सरोज या मोहनलालगंज मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्या सपाच्या तिकिटावर उभ्या आहेत. त्या दोनदा खासदार आणि दोनदा आमदार राहिलेल्या आहेत. २०१४ मध्ये त्या लोकसभा निवडणूक हरल्या होत्या. सरोज यांचे जावई अनुराग भदौरिया हे लखनऊ पूर्व येथून सपाचे उमेदवार आहेत. 2017 मध्ये देखील ते लढले होते, परंतू पराभव पत्करावा लागला होता. तर सुशिला यांचे दुसऱ्या जावयाचा छोटा भाऊ मनीष रावत यांनी एक आठवड्यापूर्वीच सपा सोडून भाजपात गेले होते.
मनीष रावत 2012 मध्ये सपाच्या तिकिटावर सीतापूरच्या सिधौली मतदारसंघातून आमदार झाले होते. 2017 मध्ये ते बसपच्या हरगोविंद भार्गव यांच्याकडून 2500 मतांनी पराभूत झाले. काही महिन्यांपूर्वी हरिगोविंद भार्गव यांनी बसपा सोडून सपाची वाट धरली होती. त्यामुळे तिकीट हरिगोविंद यांना मिळाले. यामुळे नाराज झालेले मनीष रावत हे आता भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत. मनीष यांचा रडण्याचा व्हिडीओही व्हायरल झाला हो, ज्यामध्ये ते म्हणाले की, पैसा जिंकला, कष्ट हरले.मात्र, आता कुटुंबियांसमोर निश्चितच संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनुराग भदौरिया सांगतात की, आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय असतो. त्यांच्या उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.