Uttar Pradesh Election 2022: AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बाबू सिंह कुशवाह आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्यासोबत युती करण्याची घोषणा केली. या घोषणेसोबतच त्यांनी निवडणुकीसाठीचा जंबो प्लॅन जाहीर केला. "आमची युती सत्तेवर आली तर राज्याला २ मुख्यमंत्री असतील. त्यापैकी एक ओबीसी समाजाचा असेल तर दुसरा दलित समाजाचा चेहरा असेल. तसेच, राज्यात तीन उपमुख्यमंत्रीदेखील असतील. त्यापैकी एक मुस्लिम समाजातील व्यक्ती असेल", अशी मोठी घोषणा त्यांनी केली.
यापूर्वी ओवेसींच्या AIMIM ने ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षासोबत युती करण्याची घोषणा केली होती. मात्र, राजभर यांनी मध्येच युती तोडली आणि ते सपासोबत निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आता ओवेसींनी राज्यातील बाबू सिंह कुशवाह आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्यासोबत युतीची घोषणा केली.
राजभर यांनी AIMIM शी युती तोडल्यानंतर ओवेसी म्हणाले होते की, "त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला आहे आणि निघून गेले आहेत. पण आम्ही निश्चितपणे निवडणूक लढवू आणि आमच्या अध्यक्षांनी जाहीर केले की आम्ही १०० जागा लढवण्याची तयारी करत आहोत. याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेशात फिरत आहोत. आम्ही लोकांशी संवाद साधत आहोत, जाहीर सभाही घेत आहोत. आमची पक्ष संघटना मजबूत आहे त्यामुळे आम्ही पूर्ण जोर लावू."
ओवेसी यांनी अलीकडेच राज्यातील राजकीय पक्षांवर निशाणा साधला होता. कोणत्याही राजकीय पक्षाने मुस्लिमांच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केलेले नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता. "उत्तर प्रदेशातील मुस्लिमांचा विकास, सुरक्षा आणि समावेश याबाबत सर्वच राजकीय पक्ष उदासीन आहेत. उत्तर प्रदेशातील मुस्लिमांवर अन्याय झाला आहे. राज्यातील कोणत्याही सरकारने राज्यातील मुस्लिमांच्या विकासासाठी काम केलेले नाही", असं ओवेसी म्हणाले होते.