- गजानन चोपडेबागपत : महाभारत काळात दुर्योधनाने कुटील डाव आखत ज्या लाक्षागृहाला आग लावून पांडवांना संपविण्याचा प्रयत्न केला होता, ते बर्नावा येथील लाक्षागृह या निवडणुकीत कुणाची आहुती देणार, हा प्रश्न सध्या माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा बालेकिल्ला असलेल्या बागपत मतदारसंघात खमंग चर्चेचा मेन्यू झाला आहे.१९७७ पासून आतापर्यंत सहा वेळा या मतदारसंघातून भाजपने बाजी मारली, तर दोनदा समाजवादी पक्षाचा येथे विजय झाला. २०१७ साली भाजपचे योगेश घामा हे ३१ हजार ३६० मतांच्या अंतराने विजयी झाले होते, तर बहुजन समाज पक्षाचे अहमद हमीद यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचाच फायदा भाजपला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झाला आणि डॉ. सत्यपाल सिंह खासदार झाले. यंदाही निवडणुकीत हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा थेट विभागणीचे संकेत आहेत. ऊस उत्पादकांचाही प्रश्न महत्त्वाचा आहे.
केंद्र शासनाने कृषीविषयक कायदे परत घेतल्यानंतर शेतकऱ्यांचा संताप कमी झाला आहे का? द्वेषयुक्त भाषणामुळे अल्पसंख्याकांचे ध्रुवीकरण होईल का? या प्रश्नाचे उत्तर या निवडणूक निकालात सापडेल. उत्तर प्रदेशमध्ये ४०३ जागांवर मतदान होणार असून यापैकी किमान ११० विधानसभा जागांवर शेतकरी आंदोलनाचा परिणाम झाल्याचे जाणवते.
इथे राकेश टिकैतही एक चेहरा म्हणून समोर आले आहेत. ते कोणाला पाठिंबा देणार आणि भाजपाची इथे काय स्थिती असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता येथे जाणवली.
उत्तर प्रदेशात या भागात २०१७ मध्ये भाजपाने ८० जागा जिंकल्या होत्या. हे राज्यातील मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या असलेले क्षेत्रदेखील आहे. अशा परिस्थितीत मुस्लिमांच्या मतांच्या धर्तीवर शेतकरी आंदोलनामुळे जाटांच्या संतापाचा काय परिणाम होतो, हेदेखील पाहण्यासारखे असेल.