धनाजी कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क
वाराणसी : योगी सरकारने पाच साल में कुछ अच्छे काम किये जरूर है, लेकीन सांड और गाय के बारे में जो वादा किया था वो पुरा नहीं किया. उसी वजह से हमरा यूपी का हवा अब कुछ और ही है..! असं वाराणसीत भेटलेले मतदार सांगत होते.
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा माहोल अंतिम टप्प्यात आला, तशी रंगतदेखील वाढली आहे. कोण बाजी मारणार हे आता १० तारखेला कळेल. येथील मतदारांसोबत बोलताना शेवटचा टप्पा किती महत्त्वाचा मानला जातो, याचा अंदाज आला.
पन्नाशीत असलेले जौनपूरचे जंगबहादूर यादव राजकारणाबरोबर सामाजिक परिस्थितीबद्दल बोलत होते. योगी सरकारने नागरिकांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा पायंडा पाडला. अखिलेश यादव सत्तेत होते, तेव्हा त्यांनी मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यावर भर दिला होता.
जनतेला आता सार्वजनिक विकासापेक्षा व्यक्तिगत विकासाचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असल्याने ते तत्काळ मिळणाऱ्या फायद्याचा विचार करतात. मात्र, आता यूपीची हवा बदलली आहे, असे त्यांना वाटते. उत्तर प्रदेशात मोकाट जनावरांचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे.
मोकाट जनावरांमुळे शेतीचे नुकसान होते. अपघात होतात. लोक मारले जातात; पण सरकारने ठोस काही केले नाही. त्याचा प्रचंड राग जनतेच्या मनात आहे.
गाजीपूरचा मोहम्मद अरशद हा तरुण म्हणाला, मी परदेशात असतो. राज्यातच काम मिळाले तर आम्हाला परदेशात जाण्याची गरज नाही. राजकारणी आश्वासने देतात, ती पाळली जात नाहीत. आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, विवेक जागा ठेवून त्याचा उपयोग केला पाहिजे.
मिर्जापूरचे इम्तियाजअली अन्सारी मुंबईत खारघरमध्ये छोटा व्यवसाय करतात. भाजप-सपमध्येच मुख्य लढत असली तरी इतर पक्षांची काही प्रमाणात ताकद आहेच. त्यामुळे एका पक्षाला बहुमत मिळेल अशी परिस्थिती नाही, आघाडी करूनच सरकार स्थापन करावे लागणार आहे. जातिधर्माच्या नावावर मते फिरविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
रोजगाराची केवळ घोषणाच राहू नये
कौशिक घोष हे मूळचे पश्चिम बंगालचे. व्यवसायामुळे वाराणसीत असतात. ते म्हणाले, भाजपला जागा जास्त मिळणार नाहीत; पण सरकार त्यांचेच येईल. राकेश कुमार हा तरुण म्हणाला, तरुण वर्गाची मतेही निर्णायक ठरतील.