नवी दिल्ली-
ऋषिकेशपासून ३६ किमी दूरवर असलेलं नीलकंठ महादेव मंदिर लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. याच मंदिराच्या परिसरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी बहिण प्रसादाचं दुकान चालवते. तसंच दररोज आपल्या लहान भावाच्या यशासाठी भगवान शंकराकडे प्राथर्ना करते.
नीलकंठ मंदिराबाहेर एकूण ७० प्रसाद आणि इतर पुजा साहित्याची दुकानं आहेत. यात एक दुकान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी बहिण शशि पयाल यांचं आहे. ज्या दुकानातून आपण प्रसाद घेत आहोत किंवा चहा-नाश्ता करत आहोत त्या दुकानाची मालकीण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बहीण आहे याची कुणी कल्पनाही केली नसेल. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या भाऊ यशस्वी व्हावा यासाठी शशि पायल या रोज भगवान नीलकंठ महादेवाकडे प्रार्थना करतात. भाऊ योगी आदित्यनाथ यांच्या कपाळावर विजयाचा तिलक पाहणं हे आपलं स्वप्न असल्याचं शशि पायल सांगतात.
१९९४ नंतर कधीच बांधली नाही राखीबालपणापासूनच योगी आदित्यनाथ यांचा स्वभाव इतर भावंडांपेक्षा खूप वेगळा होता. ते खूप गंभीर प्रवृत्तीचे होते. दरवर्षी रक्षाबंधनासाठी त्या योगी आदित्यनाथ यांना राखी आठवणीनं पाठवतात पण १९९४ सालापासून आजवर एकदाही त्यांना राखी बांधण्याची संधी मिळालेली नाही. १९९४ साली योगी आदित्यनाथ यांनी संन्यास घेतला. त्यानंतर रक्षाबंधनाचा योग कधीच जुळून आलेला नसल्याचं त्या सांगतात. योगी आदित्यनाथ यांनी संन्यास घेतल्यानंतरही एक दिवस येईल की आपला भाऊ घरी परतेल असं वाटत होतं. पण आता तशी शक्यता नसल्याचंही त्या म्हणाल्या.
योगी आदित्यनाथ यांच्या स्वभावातील रोखठोकपणा आणि तितकाच मृदू भाव त्यांना वारसा हक्कानंच मिळाला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. योगी आदित्यनाथांना एकूण ७ भावंडं होती. यात शशि पायल या सर्वात मोठ्या आणि योगी आदित्यनाथ पाचव्या क्रमांकाचे बंधू आहेत. ३१ वर्षांपूर्वी शशि यांचा विवाह कोठार गावातील पूरण सिंह पयाल यांच्याशी झाला. पती-पत्नी दररोज कोठार गावातून पायी चालत जवळपास अडीच किमी अंतर पार करुन नीलकंठ मंदिर परिसरातील दुकानात येतात. दररोज सकाळी सात वाजता दुकान उघडतात आणि दुपारी चार वाजता दुकान बंद करुन घरी परतात. शशि यांना तीन मुलं आहेत. एका मुलाचा विवाह देखील झाला आहे.