लखनौ - देशाच्या 5 राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. भाजपने पंजाब वगळता इतर सर्वच राज्यांमध्ये कमळ फुलविण्यात यश मिळवलं असून भाजपच्या विजयाचा देशभरात जल्लोष होत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर कार्यालयापासून लखनौपर्यंत भाजप कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. लखनौमधील कार्यालयात 1.5 वर्षांचा मुलगा योगी आदित्यनाथ यांच्या रुपात दिसून आला.
उत्तर प्रदेशात प्राथमिक कल पाहता भाजपानं बहुमताचा आकडा गाठला आहे. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा आता एका झटक्यात राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर पोहोचली आहे. युपीत आता योगी देशाचे भावी पंतप्रधान असल्याच्याही घोषणा देण्यास भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाच्या शानदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर गोरखनाथ मंदिराच्या बाहेर जोरदार सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. भाजपाचे कार्यकर्ते पुष्पवृष्टीच्या माध्यमातून आपला आनंद साजरा करत आहेत.
संपूर्ण राज्यात भाजपच्या विजयाचं सेलिब्रेशन सुरू असून भाजप कार्यकर्ते पक्ष कार्यालयात गर्दी करतानाचे चित्र आहे. दुसरीकडे लखनौ येथील पक्ष कार्यालयात एक 1.5 वर्षांचा चिमुकला योगी आदित्यनाथ यांच्या पेहरावात दिसून आला. विशेष म्हणजे त्याचा हातात बुलडोझर असून कपाळी टीळाही दिसून येत आहे. योगींनी बुलडोझर भरुन मतं मिळवली, असे संकेत या चिमुकल्याच्या हातातील बुलडोझर देत आहे.
भाजपात योगींना मिळणार मोठा पाठिंबा!
राजकीय जाणकारांच्या मतानुसार यूपीतील विजयानंतर योगी आदित्यनाथ यांना पक्षात मोठा पाठिंबा मिळणार आहे. आतापर्यंत योगी आदित्यनाथ यांना भाजपाच्या कॅडरमध्ये पाचव्या क्रमांकांचं स्थान असलेला नेता असं म्हटलं जात होतं. पण या विजयानंतर योगी आदित्यनाथ आता पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनतील असं म्हटलं जात आहे.
‘गुंडगिरीचा पराभव’
जनता जिंकत असून गुंडगिरीचा पराभव होत असल्याचं विधान उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केलं आहे. भाजपा नेते बृजेश पाठक यांनीही पक्षाच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला आहे. "यूपीच्या जनतेने समाजवादी पक्षाला स्पष्टपणे नाकारलं आहे", असं पाठक म्हणाले.