लखनौ – अलीकडेच उत्तर प्रदेशसह ५ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपाने ४ राज्यात सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. या निवडणूक निकालाच्या वेगवेगळ्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. परंतु आता उत्तर प्रदेशातील निवडणुकीमुळे एक कुटुंब विभक्त झाल्याचं समोर आलं आहे. गृहिणी ते आमदार आणि योगी सरकारच्या पहिल्या कारकिर्दीत मंत्री बनण्याचा प्रवास करणाऱ्या स्वाती सिंह पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
स्वाती सिंह यांनी बलियातून भाजपा आमदार झालेले दयाशंकर सिंह यांच्यासोबत घटस्फोट घेण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. दयाशंकर सिंह यांच्याविरोधात स्वाती सिंह यांनी घटस्फोटाचा खटला पुन्हा सुरू करावा अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. एकेकाळी स्वाती सिंह त्यांच्या कुटुंबासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या आणि पती दयाशंकर सिंह यांच्यासाठी राजकीय ढाल बनल्या होत्या. परंतु आता स्वाती सिंह यांनी पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी स्वाती सिंह यांनी १० वर्षापूर्वी कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याची पुन्हा सुनावणी करण्याची विनंती कोर्टाला केली आहे. स्वाती सिंह या आमदार आणि मंत्री बनण्याच्या आधीपासून दयाशंकर सिंह यांच्यासोबत नात्यात दुरावा आला आहे. स्वाती सिंह आणि दयाशंकर सिंह यांच्यात २००८ पासून भांडणं सुरू झाली. हे प्रकरण कोर्टात पोहचले. दयाशंकर सिंह यांच्याशी घटस्फोट घेण्यासाठी लखनौ कौटुंबिक न्यायालयात २०१२ मध्ये स्वाती सिंह यांनी खटला दाखल केला. कोर्टाने दयाशंकर सिंह यांना त्यांचे म्हणणं मांडण्यासाठी नोटीस जारी केली होती. त्यावेळी दयाशंकर सिंह यांनी बसपा प्रमुख मायावतींबाबत वादग्रस्त विधान केले. त्यामुळे भाजपा बॅकफूटवर गेली. त्यांना पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित केले. मात्र बसपा नेत्यांनी दयाशंकर यांची पत्नी स्वाती सिंह आणि मुलीबाबत अश्लिल विधाने केली. त्यामुळे स्वाती सिंह यांनी बसपाविरोधात मोर्चा उघडला. त्यांचा आक्रमक पवित्रा भाजपा हायकमांडला दिसला.
स्वाती सिंह यांनी बचाव मुलीचा केला परंतु दयाशंकर सिंह यांच्यासाठी राजकीय ढाल बनल्या. स्वाती सिंह यांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना भाजपा महिला मोर्चाचं अध्यक्षपद मिळालं. त्यानंतर लखनौच्या सरोजनीनगर जागेवरून उमेदवारी मिळाली. ज्याठिकाणी भाजपा ३ दशकांपासून विजयाची वाट पाहत होती. त्या सरोजनीनगर जागेवर सहानुभूती आणि मोदी लाटेमुळे स्वाती सिंह निवडून आल्या. त्यानंतर योगींच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले. २०१७ मध्ये मंत्री बनल्यानंतर स्वाती सिंह यांनी दयाशंकर सिंह यांच्यासोबत घटस्फोट घेण्याच्या याचिकेवर पुढे काहीच केले नाही. २०१८ मध्य कोर्टाने दोन्ही पक्ष कोर्टात येत नसल्याने केस बंद केली. आता कोर्टाचे हे आदेश परत घेण्यासाठी स्वाती सिंह यांनी याचिका केली आहे.
२०२२ च्या निवडणुकीत पुन्हा पती-पत्नी आमनेसामने
स्वाती सिंह आणि दयाशंकर सिंह यांच्या नात्यात दुरावा होता. २०१७ नंतर हा दुरावा कमी झाला. स्वाती सिंह मंत्रिपदात रमल्या तर दयाशंकर सिंह पक्षाच्या कामात व्यस्त झाले. परंतु २०२२ निवडणूक आल्यानंतर पुन्हा दोघं समोरासमोर आले. स्वाती-दयाशंकर यांच्यात झटापट झाली. दोघांनीही सरोजनीनगर जागेवर दावा सांगितला. अशावेळी भाजपानं स्वाती सिंह ऐवजी राजेश्वर सिंह यांना उमेदवारी दिली. तर दयाशंकर सिंह यांना बलिया येथून निवडणूक लढवण्यास सांगितले. दयाशंकर सिंह विजयी झाले आणि आता मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.