उत्तर प्रदेशात आज विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला. यात समाजवादी पक्षानं मतदान यंत्रात गडबड केल्याचा आरोप केला आहे. मतदानावेळी मतदारानं सायकल चिन्हाचं बटण दाबूनही त्यांना कमळाला मत दिल्याची स्लिप (चिठ्ठी) मिळत असल्याची तक्रार समाजवादी पक्षानं निवडणूक आयोगाकडे केली. सपानं मुरादाबादमधील एका मतदाराचा व्हिडिओ देखील याचा पुरावा म्हणून ट्विट केला आहे. तसंच निवडणूक आयोगानं यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी देखील सपानं केली आहे.
सायकल चिन्हाचं बटण दाबल्यानंतरही कमळाला मत दिल्याची चिठ्ठी मतदारांना प्राप्त होत असल्याचा आरोप करणारा एका मतदाराचा व्हिडिओ सपानं ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे.
'सपा'च्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. "मुरादाबाद ग्रामीण विधानसभा २७, बूथ क्रमांक ४१७ वर सायकल चिन्हावर बटण दाबूनही कमळाला मतदान दिल्याची चिठ्ठी मतदारांना मिळत आहे. हे अतिशय गंभीर प्रकरण असून यात निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनानं माहिती घेऊन निष्पक्ष चौकशी करावी", असं 'सपा'नं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
समाजवादी पक्षानं रामपूरमध्ये बूथ ताब्यात घेण्यात आल्याचाही आरोप केला आहे. तसंच याआधी सहारनपूर जिल्ह्यातील बेहट विधानसभा मतदार संघाच्या बूथ क्रमांक १७० वर सायकल चिन्हाचं बटण दाबल्यानंतर कमळाची स्लिप येत असल्याचा आरोप केला होता.