नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांची छोटी सून अपर्णा यादव आज भाजपात सहभागी होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पक्षाचे अन्य वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अपर्णा भाजपात प्रवेश करतील. गेल्या काही दिवसांपासून सपाने भाजपाचे नाराज मंत्री, आमदार फोडण्याचा सपाटा लावला होता. यावर भाजपाने अखिलेश यादवांच्या घरातच सुरुंग लावून जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
अपर्णा यादव ही मुलायम सिहांचा लहान मुलगा प्रतीक यादव यांची पत्नी आहे. तिने अनेकदा उघडउघड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची स्तुती केलेली आहे. अपर्णा यादव यांनी २०१७ मध्ये लखनऊ कैंटमधून विधानसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांना रीटा बहुगुणा जोशी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. गेल्या काही दिवसांपासून अपर्णा या भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. प्रतीकची आई साधना गुप्ता या मुलायम सिहांची दुसरी पत्नी आहेत. अपर्णा दिल्लीत पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे.
अपर्णा यादव ही एका पत्रकाराची मुलगी आहे. तिने ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापीठातून इंटरनॅशनल रिलेशन अँड पॉलिटिक्समध्ये मास्टर केली आहे. अपर्णा आणि प्रतीक यांचे लग्न २०१० मध्ये मुलायम सिहांचे गाव सैफईमध्ये झाले होते. अपर्णा यांचे शिक्षण लखनऊच्या लोरेटो कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले. अपर्णा यांना सुरुवातीपासूनच राजकारणाची आवड होती. याशिवाय त्यांना संगिताची देखील आवड आहे. अपर्णा यादव यांची एक महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या अधिकारांसाठी लढणारी संस्थादेखील आहे. अपर्णा, प्रतीक यादव आणि अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव यांच्यात फारसे पटत नव्हते. यामुळेच अपर्णा यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.