मिर्झापूर : यंदाची उत्तर प्रदेशात होत असलेली विधानसभेची निवडणूक कमालीची अटीतटीची होत आहे. गेल्यावेळी एकतर्फी विजय मिळवणाऱ्या भाजपाची अखिलेश यादव यांच्या झंझावाती प्रचारासमोर दमछाक होत आहे. त्यामुळे यावेळी उत्तर प्रदेशात सत्तापरिवर्तन होणार असल्याचे दावे करण्यात येत आहेत.
उत्तर प्रदेश विधानसभेच्या शेवटच्या आणि सातव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण 613 उमेदवार 54 जागांवर आपले नशीब आजमावत आहेत, ज्यात 11 अनुसूचित जातींसाठी राखीव आणि दोन अनुसूचित जमातीसाठी जवळपास 2.06 कोटी मतदारांचा समावेश आहे. तसेच, उत्तर प्रदेशात मतदानाचे प्रमाण कमी आहे. सहाव्या टप्प्यात 55 टक्के मतदान झाले. त्यामुळे भाजप चिंतेत आहे.
केंद्रीय मंत्री अनुप्रिया सिंह पटेल यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मिर्झापूर येथील एका बूथवर मतदान केले. मतदान केल्यानंतर अनुप्रिया सिंह पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, "मी मिर्झापूरमध्ये मतदान केले आहे. मला विश्वास आहे की, मतदारसंघातील सर्व 5 जागांवर आमच्या एनडीएचे उमेदवार जिंकतील."
दरम्यान, आझमगड, मऊ, जौनपूर, गाझीपूर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर, भदोही आणि सोनभद्र या जिल्ह्यांमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान सुरू आहे. या टप्प्यातील प्रमुख स्पर्धकांमध्ये उत्तर प्रदेशचे मंत्री नीलकंठ तिवारी, अनिल राजभर, रवींद्र जायस्वाल, गिरीश यादव आणि राम शंकर सिंह पटेल यांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात दाखल झालेले दारा सिंह चौहान हेही मऊ येथील घोसी येथून निवडणूक लढवत आहेत.