नवी दिल्ली - संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशमधील मतदानाची प्रक्रिया आज आटोपली आहे. त्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल येऊ लागले आहेत. दरम्यान, रिपब्लिक टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात भाजपाच्या काही जागा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी भाजपा उत्तर प्रदेशमध्ये अडीचशेपेक्षा अधिक जागा जिंकू शकतो, तर समाजवादी पक्षही १०० हून अधिक जागांवर विजयी होईल, असा कल रिपब्लिक टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला ४५ टक्के जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाला ३५ टक्के जागा मिळण्याची शक्यता आहे. या मतांचे जागांमध्ये रूपांतर केले असता उत्तर प्रदेशात भाजपाला २६२ ते २७७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाला ११९ ते १३४ जागा मिळण्याची शक्यता आहे. बहुजन समाज पक्षाला ७ ते १५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ३ ते ८ जागा मिळण्याची शक्यता आहे. रिपब्लिकच्या एक्झिट पोलच्या आकड्यानुसार भाजपा - २६२-२७७सपा - ११९-१३४ बसपा - ७-१५काँग्रेस - ३-८
दरम्यान टीव्ही ९ पोलस्ट्रेटच्या एक्झिट पोलनुसारही उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता कायम राहण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलनुसार भाजपाला २११ ते २२५, समाजवादी पक्षाला १४६ ते १६०, बसपाला १४ ते २४ आणि काँग्रेसला ४ ते ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या ४०३ जागांसाठी सात टप्प्यात मतदान झाले होते. आज सातव्या टप्प्यातील मतदान आटोपले. भाजपा, सपा, बसपा आणि काँग्रेस असे चार प्रमुख पक्ष असलेल्या उत्तर प्रदेशात यावेळी भाजपा आणि सपामध्ये थेट लढत झाली होती. त्यात अखिलेश यादव यांच्या झांझावाती प्रचारामुळे भाजपासमोर आव्हान निर्माण झाले होते.