नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील (Saharanpur) वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी इच्छा मरणाला परवानगी द्यावी, अशी विनंती राष्ट्रपतींकडे केली आहे. ग्लोकल मेडिकल कॉलेजची मान्यता रद्द झाल्यामुळे वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, मात्र या महाविद्यालयाला मान्यता मिळालेली नाही. कुठूनही न्याय मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शहर दंडाधिकाऱ्यांकडे राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देत इच्छा मरणाला परवानगी देण्याची मागणी केली.
मान्यता नसताना अंधारात ठेवून लाखो रुपयांची फी वसूल केली असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. सहारनपूर जिल्ह्यातील बसपाचे विधान परिषद सदस्य आणि खाण व्यावसायिक मोहम्मद इक्बाल यांची ही ग्लोकल युनिव्हर्सिटी आहे. मात्र, याला मान्यता न मिळाल्याने आता विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे. 'त्यामुळे आम्हाला इच्छा मरणासाठी परवानगी द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.
मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जात शहर दंडाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. या निवेदनात, 2016 मध्ये ग्लोकल मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले आहे. आम्ही सातत्याने तीन ते चार वर्ष एमबीबीएसचा (MBBS) अभ्यास सुरू ठेवला. दोन वर्षं शिक्षण घेतल्यानंतर तीन महिन्यांतच आम्हाला डिस्चार्ज मिळाल्याचे समजले. परंतु, याबाबत कॉलेज व्यवस्थापनाने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
आमच्याकडून फी वसूल केल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांनी यानंतर न्यायालयात धाव घेतली होती, परंतु, तिथे देखील त्यांना न्याय मिळाला नाही. ग्लोकल मेडिकल कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थ्याचे 30 ते 35 लाख रुपये खर्च झाले आहेत. यापुढे खर्च करण्याची आमची आता स्थिती नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी करत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.