उत्तर प्रदेशच्या जिल्हा रुग्णालयात महिला रुग्णासोबत धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. महिला रुग्ण हिंसक झाल्यानंतर रुग्णालयातील एका नर्सने तिचे केस ओढले. मग बेडवर ढकललं आणि शिवीगाळही केली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने नर्सच्या कृत्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. रुग्णासोबत कोणतेही गैरवर्तन झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सीतापूर जिल्हा रुग्णालयाचा हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये एक नर्स महिलेचे केस पकडून तिला बेडकडे ओढत असल्याचं दिसत आहे. हे करत असताना ती महिलेला बेडवर आणते. मग तिचे केस धरून तिला ढकलते. याच दरम्यान इतर आरोग्य कर्मचारी देखील तिच्या मदतीसाठी उभे असल्याचं दिसत आहे.
सीतापूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आरके सिंह यांनी व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना सदर महिला रुग्णाला 18 ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते. उपचारासाठी दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री तिचे कुटुंबीय रुग्णालयाबाहेर पडल्यानंतर ही महिला दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान वॉशरूममध्ये गेली आणि अचानक हिंसक वर्तन करू लागली असं म्हटलं आहे.
डॉ सिंह यांनी दावा केला, "महिलेने तिच्या बांगड्या फोडायला आणि कपडे फाडायला सुरुवात केली. हे पाहून वॉर्डमधील इतर महिला रुग्णांमध्ये भीती पसरली. तिला थांबवण्यासाठी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. वॉर्डमध्ये ड्युटीवर असलेल्या नर्सने पोलिसांना कळवले. त्याचवेळी इतर वॉर्डातील नर्स मदतीला धावल्या."
नर्सने गैरवर्तन किंवा अपमान केल्याचे सर्व आरोप डॉक्टरांनी फेटाळून लावले आहेत. डॉ. सिंह म्हणाले की, "इंजेक्शन देण्यापूर्वी महिला रुग्णाला थांबवणे आणि तिला बेडवर आणणे आवश्यक होते. तेव्हाच ती शांत होऊ शकली. यानंतर, कुटुंबीय आल्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"