उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात झाला आहे. हाथरस येथे भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने कावडधाऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हे कावडधारी हरिद्वारहून ग्वाल्हेरच्या दिशेने जात असताना एका भरधाव डंपरने त्यांना धडक दिली आणि यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख पोलिसांनी पटवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हाथरस येथे झालेल्या या अपघातातील 5 भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच एक जण गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहे. कोतवाली सादाबाद बढार चौकात हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. तसेच अधिक तपास करण्यात येत आहे.
आग्रा झोनचे एडीजी राजीव कृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2.15 वाजता हाथरसमधील सादाबाद पोलिस स्टेशनमध्ये सात भक्तांना डंपरने चिरडलं, ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आणि 1 गंभीर जखमी झाला. ते कावड घेऊन हरिद्वारहून ग्वाल्हेरला जात होते. ही घटना इतकी भयावह होती की परिसरात खळबळ उडाली. आग्रा एडीजी, डीआयजी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले. कावडधाऱ्यांना चिरडल्यानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी डंपर चालकाचा शोध सुरू केला आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस जिल्ह्यात एका रस्ते अपघातात 6 कावडधाऱ्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करतानाच मुख्यमंत्र्यांनी शोकाकूल कुटुंबीयांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.