UP Hathras stampede 2024: उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील फुलराई गावातील सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत सूमारे 100 लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. नारायण साकार हरी किंवा साकार विश्व हरी उर्फ भोले बाबा, यांच्या सत्संगात ही दुर्दैवी घटना घडली आहे. चेंगराचेंगरीची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ अपघातस्थळी पोहोचून बचावकार्य राबवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, अनेकांना प्रश्न पडला असेल की, हे भोले बाबा नेमके कोण आहेत?
नारायण साकार हरी किंवा साकार विश्व हरी उर्फ भोले बाबाचा जन्म उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात झाला. भोले बाबा स्वतःला इंटेलिजन्स ब्युरो (IB) चे माजी कर्मचारी असल्याचे सांगतात. असा दावा केला जातो की, 26 वर्षांपूर्वी बाबांनी आपली सरकारी नोकरी सोडली आणि धार्मिक प्रवचन देण्यास सुरुवात केली. भोले बाबांचे पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, दिल्लीसह देशभरात लाखो अनुयायी आहेत. विशेष म्हणजे, इतर बाबा/संत/कथाकारांप्रमाणे भोले बाबा सोशल मीडिया अॅक्टिव्ह नाहीत. बाबांचे कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिकृत खाते नाही. त्यांच्या भक्तांचा असा दावा आहे की, भोले बाबांचे त्यांच्या क्षेत्रात अनेक अनुयायी आहेत.
संबंधित बातमी- मृतदेहांचा खच, नातेवाईकांचा आक्रोष, हारसमधील दुर्घटनास्थळावर भयावह दृश्य
पश्चिम उत्तर प्रदेशातील अलीगढ आणि हाथरस जिल्ह्यात दर मंगळवारी नारायण साकार हरी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, त्यात हजारो लोक जमतात. या वेळी भोले बाबांशी संबंधित हजारो स्वयंसेवक भक्तांसाठी खाण्यापिण्यासह आवश्यक व्यवस्था करतात. कोरोनाच्या काळात बंदी असतानाही हजारोंचा जनसमुदाय जमवून भोले बाबा प्रसिद्धीच्या झोतात आले. दरम्यान, आज मानव मंगल मिलन समागम समितीने हातरसमधील मुगलगढी भागात असलेल्या फुलराई गावात भोले बाबाच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात 50 हजारांहून अधिक लोकांची गर्दी जमली होती.
प्रशासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त लोक कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये सूमारे 100 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 200 हून अधिक लोक जखमी आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांचा आकडा अजून वाढू शकतो. आग्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अलिगडचे विभागीय आयुक्त यांचे पथक या घटनेची चौकशी करणार आहे. यूपी सरकारचे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी आणि संदीप सिंह घटनास्थळी रवाना झाले आहेत आणि त्यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय एडीजी, आग्रा आणि आयुक्त, अलिगड यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली असून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.