आज संपूर्ण जग एका विश्वासू सहकाऱ्याच्या शोधात आहे आणि ते पूर्ण करण्याची ताकद केवळ भारताकडेच आहे. भारताच्या क्षमतेकडे जगाचे लक्ष आहे. संपूर्ण जग भारताच्या कामगिरीची प्रशंसा करताना दिसत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटेले आहे. ते तिसऱ्या यूपी इन्व्हेस्टर्स समिटच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
तुमचे संकल्प पूर्ण होतील - मोदी म्हणाले, 'मी उत्तर प्रदेशातील काशीचा खासदार या नात्याने सर्व गुंतवणूकदारांचे स्वागत करतो. गुंतवणूकदारांनीउत्तर प्रदेशातील युवा शक्तीवर विश्वास दाखवला, यासाठी मी त्यांचे आभार मानतो. उत्तर प्रदेशातील युवा शक्तीमध्ये असे सामर्थ आहे, ज्यामुळे आपल्या स्वप्नांना आणि संकल्पांना नवी भरारी मिळू शकेल. आपण जे स्वप्न घेऊन येथे आला आहात, राज्यातील तरुणांचे परिश्रम, त्यांचे सार्मथ्य आणि त्यांचे समर्पण, आपले हे स्वप्न आणि आपला संकल्प नक्कीच पूर्ण करतील, असा विश्वास मी आपल्याला देतो.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे तिसऱ्या उत्तर प्रदेश गुंतवणूकदार परिषदेच्या ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनीमध्ये राज्यात 80,000 कोटी रुपयांपेक्षाही अधिकच्या 1,406 प्रकल्पांचा शुभारंभ केला.
मोदी म्हणाले, 'आज जागतिक पातळीवर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती आपल्यासाठी एक मोठी संधी आहे. आज जग ज्या विश्वासार्ह सहकाऱ्याच्या शोधात आहे, ते पूर्ण करण्याची ताकद केवळ आपल्या लोकशाही असलेल्या भारताकडेच आहे. भारताच्या क्षमतेकडे जगाचे लक्ष आहे. संपूर्ण जग भारताच्या कामगिरीची प्रशंसा करत आहे. एवढेच नाही, तर अगदी कोरोना काळातही भारत थांबला नाही, त्याने आपल्या सुधारणांना गती दिली. याचा परिणाम आज आपण सर्व जण पाहत आहोत, असेही मोदी म्हणाले.