लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी सायंकाळी भाजप खासदार प्रवेश सिंह वर्मा यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाट समुदायाच्या नेत्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यामुळे हा समुदाय भाजपला पुन्हा पाठिंबा देईल का? २०१७ च्या निवडणुकीआधीही अमित शहा हे जाट समुदायाच्या नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले होते. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जाट समुदायाने भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली होती. एवढेच नव्हे, तर या भागातील ७६ पैकी ६६ जागा भाजपला मिळाल्या होत्या.
त्यावेळी २०१२ मधील दंगलीमुळे जाट आणि मुुस्लिम समुदायांदरम्यान दरी पडली होती. तीन कृषी कायदेही मंजूर करण्यात आलेले नव्हते. कृषी कायद्याला विरोध करणारे राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांच्यासह हजारो शेतकऱ्यांवर लाठीमारही करण्यात आलेला नव्हता.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणाऱ्या जाट समुदायाच्या नेत्यांत भाजपचे कार्यकर्ते होते. केंद्रीय मंत्री संजीव बालियान आणि खासदार प्रवेश वर्मा यांच्याव्यतिरिक्त भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस कृष्णपाल सिंह, डाॅ. अतुल तेवतिया, अतुल चौधरी, मनोज चौधरी, भाजप किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सोमपाल चौधरी, रवींद्र राजौरा यांच्यासह जवळपास १५० कार्यकर्त्यांचा यात समावेश होता.
समाजवादी पार्टी-रालोदवरही नाराजीकिसान शक्ती संघाचे प्रमुख आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट समुदायाचे नेते चौधरी पुष्पेंद्र सिंह यांचे असे मत आहे की, ३० ते ४० टक्के जाट समुदाय आजही भाजपच्या बाजूने आहे. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे जयंत चौधरी आणि अखिलेश यादव यांची निष्क्रियता होय.